वृद्ध महिलेला उपचाराविनाच घरी पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:58 AM2018-08-09T02:58:06+5:302018-08-09T02:58:08+5:30
महापालिकेच्या रुग्णालयात ऐरोली येथील एका वृद्ध आजारी महिलेवर जुजबी उपचार करून रात्रीच्या वेळी तिला घरी पाठविल्याची धक्कादायक घटना महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात घडली आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयात ऐरोली येथील एका वृद्ध आजारी महिलेवर जुजबी उपचार करून रात्रीच्या वेळी तिला घरी पाठविल्याची धक्कादायक घटना महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात घडली आहे. पीडित महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योग्य उपचाराअभावी या महिलेचे काही बरेवाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ऐरोली सेक्टर १५ येथे राहणाऱ्या सुचिता देशमुख यांच्या सासूबाई यमुना गोपाळ देशमुख (७०) या गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरने आजारी आहेत. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्याशिवाय त्यांना अनेक दुर्धर आजार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी यमुनाबाई यांच्या पोटाला सूज आली होती, तसेच लघवीला त्रास होऊ लागला. असह्य पोटदुखी सुरू झाली. काही वेळाने बरे वाटेल या आशेवर त्यांनी वेळ काढून नेला; परंतु मंगळवारी रात्री त्यांच्या वेदना वाढल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खासगी गाडीतून महापालिकेच्या वाशी रुग्णालयात आणले. रुग्णालयात त्या वेळी बहुतेक शिकाऊ डॉक्टर होते. दोन-तीन डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तपासणीचा केवळ आव आणला. वास्तविकपणे यमुनाबाईची गंभीर प्रकृती पाहता त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार करणे गरजेचे होते; परंतु तेथील डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात बेड रिकामे नसल्याचे कारण देत त्यांना घरी जाण्यास सांगितले. तत्पूर्वी त्यांना वेदनाशामक इंजेक्शन देऊन काही औषधे लिहून दिली. विशेष म्हणजे, लिहून दिलेल्या औषधांपैकी फक्त एकच औषध रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये उपलब्ध झाले. रुग्णालयात रात्रीच्या वेळी आलेला हा अनुभव यमुनाबाईच्या सून सुचिता देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितला. या प्रकारानंतर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचे कसे हाल होतात हे समोर आले.
रु ग्ण गंभीर अवस्थेत असेल तरी त्याकडे तातडीने लक्ष दिले जात नाही. विनवण्या केल्यानंतर आधी शिकाऊ डॉक्टर रुग्ण तपासतात, त्यानंतर उपकाराचा भाव ठेवून कार्यरत डॉक्टर रुग्णाची तपासणी करतात. रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, हे कारण सांगून नातेवाइकांना घालवून देण्याचा प्रकार सर्रास घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
>यमुनाबाई देशमुख या रु ग्ण आजीला मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रासले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करणे आवश्यक होते; परंतु बेड शिल्लक नसल्याने त्यांना खाली झोपवणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांना औषधे, इंजेक्शन गोळ्या देऊन घरी पाठवले.
- डॉ. प्रशांत जवादे,
मुख्य वैद्यकीय अधीक्षक,
वाशी संदर्भ रु ग्णालय,
महापालिका