निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:33 PM2019-10-18T23:33:32+5:302019-10-18T23:34:11+5:30
रॅलीसह सभांचे आयोजन : जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न; शहरातील बंदोबस्तात वाढ
नवी मुंबई : निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी रॅली व सभांचे आयोजन केले आहे. शेवटच्या दिवशी प्रचार सुरळीत व्हावा व प्रचाराची मुदत संपल्यानंतर आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.
ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी नेरुळमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. ऐरोलीमध्ये भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी मनसेवर नाव न घेता सडकून टीका केली होती. प्रांतवादाच्या नावाखाली उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची भाषा वापरण्यात आली होती. यामुळे नेरुळमधील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे वगळता इतर कोणत्याही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी सभांचे आयोजन केलेले नाही. रॅली काढून प्रचाराचा समारोप करण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील प्रत्येक प्रभागामध्ये रॅली काढण्याचे व घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या सूचना उमदेवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. निवडणुकीतील जाहीरनामा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
नवी मुंबईमध्ये प्रचारादरम्यान अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. घणसोलीमध्ये एक ठिकाणी साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली होती. इतर कुठेही पैसे सापडलेले नाहीत. निवडणूक विभागाने भरारी व दक्षता पथके तयार केल्यामुळे अनुचित प्रकार घडलेला नाही. उमेदवारांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा स्वत: काय केले व काय करणार? यावर भर दिला आहे. यामुळे पोलिसांचा त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. पनवेल व उरण तालुक्यामध्ये काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. शिरढोणमध्ये झालेल्या भांडणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. दोन्ही परिमंडळ परिसरामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी विविध पक्षांचे पदाधिकारी समोरा-समोर येऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
पोलिसांची जय्यत तयारी
पोलीस प्रशासनाने बंदोबस्तासाठी जय्यत तयार केली आहे. शेवटच्या दिवशीच्या प्रचार रॅली व सभांच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सायंकाळी ५ नंतर कुठेही प्रचार सुरू राहणार नाही. आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. अवैधपणे मद्यविक्री करणाºयांवरही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
एपीएमसीवर सर्वांचे लक्ष
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला निवडणूक काळात सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी येथे हजेरी लावली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसनेही बाजार समितीवर लक्ष केंद्रित केले होते. प्रमुख चारही माथाडी संघटनांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचा प्रचार करणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे माथाडी संघटनेमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, या निवडणुकीमध्ये पुन्हा एपीएमसी केंद्रस्थानी असल्याचे पाहावयास मिळाले.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या सभा
नवी मुंबईमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाच्या दिवशी व माथाडी मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. माथाडी मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, अमोल कोल्हे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.
प्रचारासाठी उपस्थित नेते
खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोलीमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. बेलापूरमधील भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँगे्रसचे अमोल मिटकरी यांची सभा घेण्यात आली. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांचीही सभा घेण्यात आली असून, शनिवारी राज ठाकरे यांची सभा होत आहे. भाजपचे साताराचे उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही सभेचे आयोजन केले होते.