निवडणूक आचारसंहिता भूमाफियांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:30 AM2019-04-27T01:30:23+5:302019-04-27T01:30:32+5:30
बेकायदा बांधकामे तेजीत : महापालिका, सिडकोचे दुर्लक्ष
नवी मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता भूमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरापासून शहरात पुन्हा बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू झाला आहे. विशेषत: गाव-गावठाणात अर्धवट अवस्थेत बंद पडलेली बांधकामे पुन्हा तेजीत सुरू असल्याचे दिसून येते.
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या फिफ्टी फिफ्टी बांधकामांचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ पर्यंतची ही बांधकामे नियमित करण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे; परंतु चार वर्षे उलटली तरी त्याबाबत ठोस धोरण तयार होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर सिडको व महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपली सुरू असलेली बांधकामे बंद केली. फिफ्टी फिफ्टीच्या बांधकामांना आळा बसला. मात्र, चार वर्षांत बांधकामे नियमित होण्याच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही न झाल्याने अनधिकृत बांधकामे पुन्हा उभारली जाऊ लागली आहेत. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या बांधकामांनी वेग घेतल्याचे दिसून येते. महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागातील बहुतांशी अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याने भूमाफिया सुसाट सुटले आहेत. अगोदर कारवाई करून जमीनदोस्त झालेली बांधकामे पुन्हा उभारू लागली आहेत. तसेच मागील महिनाभरात अर्धवट अवस्थेतील बांधकामे पूर्ण झाली आहे. घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोलीसह कोपरी, सानपाडा आदी विभागात पुन्हा बेकायदा बांधकामे जोमात सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नवीन बांधकामेसुद्धा सुरू आहेत. एमआयडीसीविभागात रातोरात नवीन झोपड्या उभारल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
‘नैना’ क्षेत्रातही धडाका
आचारसंहिता लागू होताच सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. ‘नैना’च्या पहिल्या टप्प्याच्या विकासाचे नियोजन सिडकोने हाती घेतले आहे. त्यामुळे या विभागात अनधिकृत बांधकामे उभारणार नाहीत, याची दक्षता संबंधित विभागाकडून घेतली जात आहे. मात्र, निवडणुकीची धामधूम भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने या क्षेत्रात आजमितीस मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते.