निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले, शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 02:12 PM2018-06-06T14:12:50+5:302018-06-06T14:12:50+5:30
निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
नवी मुंबई- निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अवघड नाही. सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. सत्तेचा गैरवापर करणं चुकीचं असल्याचं म्हणत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
कशाची पार्श्वभूमी नसताना शिवछत्रपतींनी जनतेच स्वराज्य निर्माण केलं. मोठी पार्श्वभूमी छत्रपतींना नव्हती. अनेक घटक त्यांच्या सैन्यामध्ये सामील होते. त्यांच्या मदतीने उभं केलेलं राज्य लोकांसाठी निर्माण केलं. प्रतिगामी शक्तीला लगाम घालण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे. संघटित येऊन परिवर्तनाची चळवळ उभारण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर माजायचे नसते. पण भाजपला याचा विसर पडला आहे.
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला. सत्तेचा गैरवापर केला. पण तेथील जनतेने हा दबाव झुगारुन लावला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले. एकूणच देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकरी संकटात आहे. पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देत आहेत. पण सरकार दखल घेत नाही. देशभरात शेतक-यांची स्थिती सारखीच आहे. पण शेतक-यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी करू नये.
सध्या लोकांचे मतपरिवर्तन होत आहे. विविध पोटनिवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. पालघरमध्ये विविध पक्षांनी एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांना विचारात घेतले असते तर चित्र वेगळे असते. गोंदियाच्या पोटनिवडणुकीत मोठा गोंधळ करण्यात आला. निवडणूक यंत्र बंद पडली. उन्हामुळे हे यंत्र बंद पडल्याचा हास्यास्पद खुलासा करण्यात आला. एकूणच या निवडणुकीत भाजपाने साम, दाम आणि दंड या भूमिकेचा सत्ताधा-यांकडून अवलंब करण्यात आला.