निवडणूक विधान परिषदेची, चर्चा बेलापूर विधानसभेची; मेडिकल कॅालेजही होणार अन् ताईंना उमेदवारीही मिळणार
By नारायण जाधव | Published: July 13, 2024 03:31 PM2024-07-13T15:31:20+5:302024-07-13T15:31:35+5:30
नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतून अनेक जण इच्छुक असून, तशी दावेदारी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतून अनेक जण इच्छुक असून, तशी दावेदारी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. शिवाय शहरातील प्रस्तावित मेडिकल काॅलेजवरूनही वाद सुरू आहे. यावरून सत्ताधारी भाजपामध्येही ऐरोली आणि बेलापूरच्या विद्यमान आमदारांमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. याचा लाभ उठवून ताई-दादांच्या वादात मलाच उमेदवारी द्या, अशी मागणी करणाऱ्या एका माथाडी नेत्यास काहीही होवो बेलापूरच्या पुढच्या आमदार मंदाताई म्हात्रे या असतील आणि तेथे नवी मुंबई महापालिकेचे मेडिकल कॉलेजही होईल, असे पक्षातील इतर नेत्यांसमोरच सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर तूर्तास पडदा टाकला असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
शुक्रवारी विधान परिषदेच्या ११ जागांसाठीची निवडणूक झाली. त्यासाठी सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते विधिमंडळात ठाण मांडून होते. याच दरम्यान नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या दावेदारीबाबत चर्चा सुरू आहे. या वादात माथाडी नेते असलेले माजी आमदार नरेंद्र पाटी यांनी भाजपाच्या कार्यालयात साहेब ताई-दादांच्या वादात या खेपेला बेलापूरमधून मलाच उमेदवारी द्या, असा फासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंदाताईंसह माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसार लाड यांच्यासमोर टाकला.
त्यावेळी थाेडा उसासा घेऊन काहीही होवो बेलापूरच्या पुढच्या आमदार मंदाताई म्हात्रे या असतील आणि तेथे नवी मुंबई महापालिकेचे मेडिकल कॉलेजही होईल, असे स्पष्टीकरण देऊन फडणवीस यांनी नवी मुंबईतील वादावर तूर्तास पडदा टाकला आहे. या चर्चेबाबत मंदा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दुजोरा दिला आहे.