कर्जत : जिल्हा परिषद, पंचायत समितीकरिता मंगळवारी मतदान आहे. तालुक्यात एकूण १७२ मतदान केंद्रे आहेत. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एसटी तसेच खासगी बस, खासगी जीपसुद्धा याकरिता वापरण्यात येत आहेत. पोलीस बंदोबस्तात या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत रवाना करण्यात आले.कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. कळंब जिल्हा परिषद विभागातील पोशीर निर्वाचक गणात ११ तर कळंब निर्वाचक गणात १७ अशी २८ मतदान कें द्रे आहेत. पाथरज जिल्हा परिषद विभागातील पाथरज निर्वाचक गणात १९ तर कशेळे निर्वाचक गणात १४ अशी ३३ मतदान केंद्रे आहेत. उमरोली जिल्हा परिषद विभागातील उमरोली निर्वाचक गणात १४ आणि दहिवली तर्फे वरेडी गणात १४ अशी २८ मतदान केंद्रे आहेत. नेरळ जिल्हा परिषद विभागातील नेरळ निर्वाचक गणात १३ तर शेलू निर्वाचक गणात ९ अशी २२ मतदान केंद्रे आहेत. सावेले जिल्हा परिषद विभागातील पिंपळोली निर्वाचक गणात १३ तर सावेले निर्वाचक गणात १६ अशी २९ मतदान केंद्रे आहेत. बीड बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील वेणगाव निर्वाचक गणात १५ तर बीड बुद्रुक निर्वाचक गणात १७ अशी ३२ मतदान केंद्रे आहेत. अशी तालुक्यात १७२ मतदान केंद्रे आहेत.सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण निवडणुकीचे केंद्र असलेल्या साईकृपा शेळके सभागृहात निवडणूक कामी नियुक्त केलेल्या कर्मचारी व पोलिसांची गर्दी होती. या परिसराला एसटी आगाराचे स्वरूप आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी स्वत: लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर नियुक्ती केली. मतदानाचे सर्व साहित्य देऊन एसटी, खासगी बस, तसेच खासगी जीपने या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. (वार्ताहर)
कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज
By admin | Published: February 21, 2017 6:19 AM