नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सोमवार, २७ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शुक्र वार, २४ मे रोजी महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने नगरसेवक नवीन गवते यांनी नामनिर्देशन पत्र भरले असून, त्यांच्या विरोधात महापालिकेतील विरोधी पक्षातील शिवसेनेचे नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहे. २०१६ साली काही तांत्रिक कारणांमुळे सभापतिपद शिवसेनेकडे गेले होते. या वेळीदेखील अशा काही चमत्काराची अशा शिवसेनेला आहे.
नवी मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीची सत्ता आहे. महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, काँग्रेसचा एक, शिवसेना-भाजपचे सात असे मिळून १६ सदस्य आहेत. स्थायी समिती सदस्यांच्या संख्याबळानुसार आजवर सभापतिपद आघाडीकडेच राहिले आहे. मात्र, २०१६ साली झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या एका सदस्याने ऐनवेळी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थायी समिती सभापतिपद विरोधी पक्षाकडे गेले होते. अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आघाडीच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जात असली तरी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेनेकडे बहुमताचा आकडा कमी असला तरी काही चमत्कार घडू शकतो, असे सांगत विरोधकांना गोंधळात टाकले आहे.
सभापती निवडीसाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असून, चमत्कार घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी भोईर यांनी सांगितले. यावर महापौर जयवंत सुतार यांनी महापौर निवडणुकीपासून विरोधी पक्षाचे चमत्कार सुरू आहेत; परंतु चमत्कार काही होत नसल्याचे सांगत विरोधकांना टोला लगावला. मागील वेळेस एका सदस्याची निवड अवैध ठरविण्यात आली होती तो काही चमत्कार नव्हता, असे महापौर सुतार यांनी स्पष्ट केले.