पेंग्विन गाजवणार मुंबई पालिकेची निवडणूक

By admin | Published: January 9, 2017 06:04 AM2017-01-09T06:04:53+5:302017-01-09T06:04:53+5:30

युवराजांचे पेंग्विनप्रेम महापालिका निवडणुकीत शिवसेनेनेला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. या परदेशी पाहुण्यांचे मुंबईकरांना

Election of Mumbai Municipal Corporation to play penguin | पेंग्विन गाजवणार मुंबई पालिकेची निवडणूक

पेंग्विन गाजवणार मुंबई पालिकेची निवडणूक

Next

मुंबई : युवराजांचे पेंग्विनप्रेम महापालिका निवडणुकीत शिवसेनेनेला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. या परदेशी पाहुण्यांचे मुंबईकरांना दर्शन होण्याआधीच एका पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेना गोत्यात आली. हा वाद थंड होत नाही तोच पेंग्विनच्या दर्शनासाठी प्रौढांसाठी शंभर रुपये, १२ वर्षांखालील मुलांसाठी ५० रुपये तर प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात दहापट वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. अडचणीत आणणारा हा प्रस्ताव फेटाळून १ एप्रिल म्हणजेच निवडणुकीनंतर दर निश्चित करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मात्र या प्रस्तावामुळे पेंग्विनचा मुद्दा पुन्हा पेटला असून निवडणुकीच्या रिंगणातही पेंग्विनच गाजणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत जुलै अखेरीस पेंग्विनचे आगमन झाले. दक्षिण कोरियातून आणलेल्या हॅम्बोल्ट प्रजातीच्या आठपैकी एका दीड वर्षीय पेंग्विनचा आॅक्टोबर महिन्यात मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद उमटले. बालहट्टापायी पेंग्विनचा बळी गेल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. हे प्रकरण लोकायुक्तांच्या दरबारात पोहोचले आहे. हा वाद सुरू असतानाच पेंग्विनसाठी राणीबागेत व्यवस्था करणारी कंपनी बोगस असल्याचे उजेडात आले.
पेंग्विनच्या या वादाने शिवसेनेनला जेरीस आणले असताना दरवाढीचा नवीन प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी गटनेत्यांच्या बैठकीत आणला. पेंग्विनच्या दर्शनासाठीच नव्हे तर राणीबागेतील प्रवेश शुल्क पाचवरून ५० रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र विरोधी पक्षांनी या प्रस्तावावर चर्चा होण्याआधीच टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षांनी गटनेत्यांच्या बैठकीत गैरहजर राहून आपला विरोध दर्शवला तर शिवसेनेने वेळीच सावध होत हा प्रस्ताव फेटाळला आहे. दोन महिने पेंग्विनचे दर्शन मोफत ठेवून दर ठरवण्याचा निर्णय १ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकून शिवसेनेने आपली सुटका करून घेतली आहे. (प्रतिनिधी)

निवडणुकीनंतर पैसे मोजा
च्पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना १०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र थेट १०० रुपये कशाच्या आधारे आकारण्यात येणार याबाबत पालिका प्रशासनाकडे उत्तर नाही.
च्त्यामुळे अन्य शहरांमध्ये अशा वेगळ्या प्रकल्पासाठी काय दर आहेत, दररोज किती पर्यटक अपेक्षित आहेत, वीज बिल व इतर सुविधांचा खर्च, पेंग्विनच्या जेवणाची व विश्रांतीची वेळ याचा अभ्यास करून त्यानुसार दर निश्चित केले जाणार आहेत.
च्परदेशी पर्यटकांना जादा दर आकारून मुंबईकरांच्या दरात कपात शक्य आहे का हा पर्याय चाचपण्यात येणार आहे.

५० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या या कंपनीचे सुमारे १ कोटी ४० लाखांची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे.

मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने डिस्कव्हरी वर्ल्ड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी सेंटर, वूडलँड पार्क झू सीटल अ‍ॅण्ड कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, लॉस एंजेल्स या तीन कंपन्यांनी सादर केलेले शिफारसपत्र बोगस असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला आहे.

शिवसेनेसमोर अडचणी
मुंबईकरांच्या कराच्या पैशातून महापालिकेने पेंग्विन आणले, मग ते पाहण्यासाठी पुन्हा मुंबईकरांचा खिसा का कापला जातोय? आमचा या प्रस्तावाला विरोध आहे. तसेच जोपर्यंत पेंग्विन मृत्यूची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या संकल्पनेचे उद्घाटन होऊ देणार नाही, असे आव्हानच काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने आणखी वाद टाळण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पेंग्विन दर्शनाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय घेतला आहे.


आचारसंहितेतही बच्चेकंपनीकडून उदघाटन
पेंग्विन दर्शन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा बार निवडणुकीपूर्वी उडवण्याचे स्वप्न भंगले आहे. याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. मात्र या प्रकल्पाचे श्रेय याच निवडणुकीत घेण्याचा मोह काही शिवसेनेला सोडवत नाही. आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तर पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना होण्यासाठी आणखी वीस दिवस आहेत. त्यामुळे जानेवारी अखेरीस पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे. हे उद्घाटन महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करून शिवसेना दुधाची तहान ताकावर भागवणार आहे.


दोन महिने मोफत दर्शन
महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पेंग्विनचे दर्शन लहानग्यांना मोफत असणार आहे. मुले बरोबर असतील तरच पालकांना प्रवेश
असेल. यातही आई, वडील आणि दोन मुलांना परवानगी असेल.

नो सेल्फी : सेल्फीची क्रेझ आजकाल सर्वांनाच आहे. मात्र अशा सेल्फीच्या क्लिकने पेंग्विन बिथरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नसेल. तसेच पेंग्विनची जेवणाची वेळ, विश्रांतीची वेळ, गर्दीची सवय पाहून एका दिवसात किती पर्यटकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात येणार आहे.

पेंग्विनचे दर्शन  अद्याप नाहीच
पेंग्विनसाठी तयार करण्यात येणारी विशेष जागा अद्याप तयार नाही. त्यामुळे आतापर्यंत शिवसेनेने दोन वेळा उद्घाटन लांबणीवर टाकले आहे. आणखी २० दिवसांनी सर्व तयारी पूर्ण होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचा हल्लाबोल,
दरवाढ टळली तरी मुद्दा निवडणुकीत गाजणार

पेंग्विनच्या दर्शनासाठी दर आकारण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत शनिवारी मांडण्यात आला. मात्र अशा चर्चेचा भागच आपल्याला व्हायचे नाही, अशी नाराजी व्यक्त करीत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी बहिष्कार टाकला. तर मित्रपक्ष भाजपाचे गटनेते मनोज कोटक यापासून लांबच राहिले. भाजपाचे नगरसेवक व बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर या बैठकीत हजर होते. विरोधी पक्षातून राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ उपस्थित होते. शिवसेनेने दरवाढ टाळली तरी हा मुद्दा निवडणुकीत गाजणार हे निश्चित आहे.

महापालिकेने २५ कोटी रुपये खर्च करून  आठ हॅम्बोल्ट पेंग्विनची खरेदी केली. या पेंग्विनला भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ आॅक्टोबरला एका पेंग्विनचा मृत्यू झाला. पेंग्विनच्या मृत्यूचे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले आहे. बोगस कागदपत्र सादर करून त्यावर कंत्राटदाराने सहीच केली नसल्याचेही उजेडात आले.

पेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून, लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले होते. सध्या लोकायुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

असे आहेत दर
सध्या प्रौढांना पाच रुपये, लहान मुलांसाठी दोन रुपये
च्मार्चपर्यंत पेंग्विनचे दर्शन मुलांना मोफत, मुले बरोबर असतील तर पालकांना प्रवेश, १ एप्रिल नवीन दर प्रस्तावित ५ वरून ५० रुपये
पेंग्विन दर्शन प्रौढ १००, १२ वर्षांखालील मुले ५० रुपये

Web Title: Election of Mumbai Municipal Corporation to play penguin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.