मधुकर ठाकूर
उरण : राज्यातील सर्वात मोठी, बलाढ्य आणि वर्षाकाठी ५० कोटींच्या घरात उलाढाल असलेल्या करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ५ जानेवारी रोजी निवड होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक शिरिष सकपाळ यांनी दिली.वार्षिक सुमारे ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण ३८१२ मतदार आहेत. ३८१२ मतदारांनी १७ संचालकांची निवड केली आहे.१७ पैकी ८ सदस्यांची बिनविरोध तर उर्वरित ९ सदस्य २४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत निवडून आले आहेत.निवडून आलेले १७ संचालक ५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती अभ्यासी अधिकारी शिरिष सकपाळ यांनी दिली.
विशेष म्हणजे ६२ वर्षांच्या संस्थेच्या कारकीर्दत निवड झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांनी राजकारण बाजूला सारून पक्ष विरहित कामकाज केले.या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर मात्र अध्यक्ष, उपाध्यक्षांना राजकीय पक्षांची लेबलं लाऊन जोपासलेली प्रथा मोडीत निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.