मधुकर ठाकूर
उरण :
मागील दिड वर्षांपासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी आज पत्राद्वारे केली आहे. दिवाळीनंतर प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने जेएनपीएच्या मान्यता प्राप्त चार कामगार संघटनांची धावाधाव सुरू झाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी ॲथोरिटीॲक्ट स्थापन झाला आहे.जानेवारी २०२२ पासून बंदराचे कामकाज या ॲथोरिटी ॲक्टनुसारच सुरूही झाले आहे.प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या दोन कामगार ट्र्स्टींची मुदत वर्षांपूर्वीच तर आणखी मार्च २०२२ पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढही संपुष्टात आली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी निवडणूक घेणे अपेक्षित होते.दरम्यान केंद्रीय श्रम आयुक्तांनी दोन कामगार नियुक्त ट्र्स्टी पदासाठी येत्या २ ऑगस्ट रोजी गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याआधीच निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने जाहीर करण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यात नामुष्कीची वेळ जेएनपीए प्रशासनावर आली होती. पुन्हा निवडून लांबणीवर पडल्याने मात्र कामगार आणि कामगार संघटनांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक शुक्रवारी (२१) जाहीर झाली आहे. कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय श्रम आयुक्तांनी पत्राद्वारे दिले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जेएनपीएच्या सुमारे ५०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त ६५३ मतदार कामगार उरले आहेत. या दोन ट्र्स्टी पदाच्या निवडणूकीत जेएनपीटी कामगार एकता संघटना,न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन, न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियन या मान्यता प्राप्त कामगार संघटना निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीसाठी बंदरातील मान्यता प्राप्त कामगार संघटनांनी जय्यत तयारीही सुरू केली आहे.त्यामुळे दिवाळीनंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.