जि.प.निवडणुकांचे बिगूल वाजले
By Admin | Published: January 12, 2017 06:10 AM2017-01-12T06:10:52+5:302017-01-12T06:10:52+5:30
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २१ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात रायगड
आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २१ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ५९, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. सत्ता संघर्षासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निवडणुकांचा रणसंग्राम चांगलाचा तापणार आहे. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला आपली सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नामोहरम करावे लागणार आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांना सत्ता खेचून आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे कडवे आव्हान या निवडणुकीत पेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.
निवडणूक आयोगाने २१ फेब्रुवारीला निवडणुका घेणार असल्याचे जाहीर केले आहे, तर २३ फेब्रुवारीला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुका जाहीर केल्याने त्या क्षणापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे नव्याने विकासकामांवर बंधने आली आहेत.१०० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये सध्या शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. २१ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. शेकापकडे जिल्हा परिषदेचे १९ सदस्य आहेत, तर पाच पंचायत समित्या त्यांच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० सदस्य, तर सहा पंचायत समित्या आहेत. शेकापकडे दोन विधानसभा सदस्य, तर एक विधान परिषद सदस्य आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विधानसभा सदस्य आणि तीन विधान परिषद सदस्य आहेत.
शिवसेनेकडे एक खासदार आणि दोन आमदार आहेत. जिल्हा परिषदेचे १४ सदस्य आणि चार पंचायत समित्यांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसकडे सात जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या ताब्यात एकही पंचायत समिती नाही, तसेच त्यांचा एकही आमदार नाही. भाजपाकडे दोन आमदार आहेत आणि केवळ एकच जिल्हा परिषद सदस्य आहे. या सर्व आकड्यांचा विचार केल्यास तुलनेने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पारडे जड आहे.
शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा एकवटले आहेत. सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठी हे काही ठिकाणी एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. सर्वच जागा त्यांनी युतीच्या माध्यमातून लढल्यास, शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सध्या तरी चित्र दिसत नाही.शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे धुरंदर राजकारणी आहेत. ही जोडी जेव्हा एकत्र येते, तेव्हा समोरच्यासाठी आव्हान असते. या दोन्ही नेत्यांना ही निवडणूक महत्त्वाची असल्याने यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
राजकीय घडामोडींना येणार वेग
च्जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकत नसल्याने त्यांना स्वबळावर लढणे निश्चितच परवडणारे नाही. तीच परिस्थिती काँग्रेस, शिवसेनेची राहणार आहे. बुधवारी निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात होणार आहे. २१ फेब्रुवारीला निवडणुका होणार असल्याने दरम्यान बराच कालावधी आहे. त्या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेची ही निवडणूक महत्त्वाची असल्याने बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विजयासाठी त्यांच्या हलचाली सुरू आहेत.