पनवेल : तालुक्यातील कराडे खुर्द, चावणे, जांभिवली या तीन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर नऊ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका २३ जून रोजी होणार आहेत. २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. २३ जून रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यात पुन्हा वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पनवेल तालुक्यातील गव्हाण, वडघर, उलवे, तरघर, वाकडी, वलप, पाले खुर्द, दिघाटी, आपटा या नऊ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. गव्हाण, वडघर, उलवे, तरघर, वाकडी या पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही. वलप येथे तीन जागांपैकी दोन जागा बिनविरोध झालेल्या असून, एका जागेसाठी मतदान होणार आहे. पालेखुर्द येथील एक जागा बिनविरोध झालेली आहे. दिघाटी येथील पाच पैकी चार जागा बिनविरोध झालेल्या असून एका जागेसाठी मतदान होणार आहे. तर आपटा येथे एका जागेसाठी मतदान होणार आहे.२३ जून रोजी मतदान होणार असून १२ ठिकाणी मतदान केंद्रे असणार आहेत. तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी एकूण सात अर्ज आले असून, कराडे खुर्दसाठी तीन, चावणेसाठी दोन, जांभिवलीसाठी दोन आलेले आहेत.