कर्जत तालुक्यातील विजेचे खांब कोसळले
By Admin | Published: July 11, 2016 02:27 AM2016-07-11T02:27:07+5:302016-07-11T02:27:07+5:30
कर्जत तालुक्यात वीजपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अनेक ठिकाणचे मुख्य विजेचे खांब वादळी पावसामुळे रविवारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही
नेरळ : कर्जत तालुक्यात वीजपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अनेक ठिकाणचे मुख्य विजेचे खांब वादळी पावसामुळे रविवारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अनेक ठिकाणच्या वीज वाहिन्याही तुटल्याने काही तास वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने अनेकांना अंधारात बसावे लागले. यात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यासह सर्वत्र दोन दिवस सतत जोरदार हवा व मुसळधार पावसाने कर्जतला झोडपले आहे. दोन दिवस मोठ्या प्रमाणात हवा सुटल्याने अनेक ठिकाणी विजेचे मुख्य खांब कोसळले आहेत. शेतात बसविण्यात आलेले हे पोल जमीन दलदल झाल्याने पोल कोसळल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी जोरदार हवेने वीज वाहिन्याही तुटल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक भागात लाइट नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही भागात शनिवारी हे पोल पडल्याने अनेक गावांना रात्रभर अंधारात बसावे लागले. तर काही भागात रविवारी पहाटे पासून वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. तसेच या जोरदार हवेने अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने काही काळ रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. याचा मोठ्या प्रमाणात त्रास प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना झाला.
नेरळमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने सर्वच ठिकाणची एटीएम बंद झाली होती. तर रविवारी सुटी असल्याने सर्व बँकाही बंद त्यामुळे सर्वांनाच पैशाची अडचण निर्माण झाली. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भरपावसात चांगलीच मेहनत घ्यावी लागली. (वार्ताहर)
मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळला
च्नागोठणे : मुंबई - गोवा महामार्गावर येथील आंगर आळीनजीक धामणे इमारतीसमोर असणारे वडाचा महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळल्याने रविवारी दोन्ही बाजूंची वाहतूक दुपारी चार वाजल्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होेती. याच दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्याने रामनगरकडे जाणारा एक पादचारी झाडाखाली थांबला असता झाड कोसळल्याने जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रु ग्णालयात दाखल के ले. महामार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूंकडे जाणाऱ्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या असून, एसटी बसेस तसेच हलकी वाहने नागोठणे शहरातून महामार्गाकडून वळविण्यात आली आहेत. च्सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून संबंधित झाड पाडण्यासाठी काम करणाऱ्या कंपनीकडून झाडाच्या परिसरातील माती खोदून ठेवल्याने तसेच त्याची मुळे यापूर्वीच तोडून ठेवली असल्याने दुपारी वादळी पावसामुळे हा महाकाय वृक्ष कोसळला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. कंपनीची यंत्रणा हे झाड बाजूला करण्याच्या कामाला लागली असून, सायंकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीस खुला झाला.
१माथेरान : माथेरान हे येथे वाहन नसल्याने प्रदूषण नाही, म्हणून पर्यटकांची माथेरानला पहिली पसंती आहे. यामुळे रविवारी सेकण्ड वीकेंडमुळे माथेरान हाऊसफुल झाले. परंतु सकाळपासून वादळीवारा आणि पावसामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू होता, मात्र अचानक पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने वन विभागाच्या एकमेव असलेल्या वाहनतळावर वाहन लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने गाडी पार्किंगसाठी पर्यटकांना शोधाशोध करावी लागली.
२भर वारा-पावसात हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली मिळावी म्हणून तारेवरची कसरत करावी लागली. पर्यटकसंख्या जास्त झाल्याने काहींना राहण्यासाठी खोल्या नसल्याने त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पर्यटकांना दुकानाच्या शेडखाली रात्र काढावी लागली. सतत पाऊस सुरू असल्याने काही पर्यटकांनी घोडेस्वारी करून माथेरानमधील पावसाचा मनमुराद आनंद लुटला, तर काहींनी रूममध्येच राहणे पसंत केले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पर्यटकांचे हाल झाले.
३अचानक बत्तीगुल झाल्याने रात्रीच्या वेळी माथेरान येथे आलेल्या पर्यटकांना भाड्याने घेतलेली खोली शोधताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तर शार्लोट लेक परिसरात कु टुंबासह फिरावयास गेलेल्या ममता चव्हाण यांच्या अंगावर झाड उन्मळून पडले.
४डोक्याला दुखापत झाल्याने जखमी ममता चव्हाण यांच्यावर माथेरानमधील बी. जे. हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा एकही कर्मचारी मदतीसाठी न आल्याने पर्यटकांमध्ये नाराजी दिसून आली.