नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील विद्युत यंत्रणा धोकादायक बनली आहे. डीपी बॉक्स व सबस्टेशनची झाकणे उघडली असून, विजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एपीएमसीने पाठपुरावा करूनही महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांमधील असंतोष वाढू लागला आहे.नवी मुंबईमध्ये ७२ हेक्टर जमिनीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची पाच मुख्य व एक विस्तारित मार्केट उभारले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणूनही या संस्थेची ओळख आहे. मार्केट विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. विद्युत यंत्रणेसाठीही उत्तम नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक मार्केटमध्ये सबस्टेशन, डीपी बॉक्ससाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. जागा उपलब्ध करून देणे ही बाजारसमितीची जबाबदारी असून, त्या ठिकाणी बसविलेले डीपी बॉक्स व सबस्टेशनची देखभाल करण्याची जबाबदारी महावितरणची आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये महावितरणकडून येथील विद्युत यंत्रणेची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. कांदा, बटाटा मार्केटमध्ये डीपी बॉक्स उघडले आहेत. लिलावगृहाच्या बाजूच्या सबस्टेशनच्या जागेत मद्यपीचा अड्डा सुरू आहे. मसाला मार्र्केटमध्येही डीपी बॉक्स उघडे आहेत. रहदारीच्या ठिकाणी हे बॉक्स असल्यामुळे विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.फळ मार्केटमध्येही विद्युत व्यवस्थेची स्थिती बिकट झालेली आहे. अनेक ठिकाणी डीपी बॉक्स उघडे आहेत. येथील सबस्टेशनमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर मुक्काम करतात. या ठिकाणी काही वेळेला स्टोव्हच्या साहाय्याने स्वयंपाकही केला जात आहे. गांजा ओढणाऱ्यांचीही येथे ये-जा सुरू असते. मद्यपींचाही अड्डा सुरू असून नकळतपणे विजेचा धक्का बसून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने भाजीपाला व धान्य मार्केटमध्येही परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे.विद्युत बॉक्सजवळून जातानाही भीती वाटू लागली आहे. पावसाळ्यामध्ये उघड्या बॉक्समुळे आग लागण्याचीही शक्यता आहे. बाजारसमिती प्रशासनाने अनेक वेळा महावितरणकडे पत्रव्यवहार करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. गतवर्षी महावितरणच्या अधिकाºयांसोबत संयुक्त पाहणी करून दुरुस्तीची कामे करण्याचे निश्चित केले होते, परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे व्यापारी व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अशीच स्थिती राहिली व एखादी दुर्घटना घडली, तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही कामगारांनी दिला आहे.बाजारसमितीमधील विद्युतविषयी समस्या१. पाचही मार्केटमधील डीपी बॉक्सची झाकणे उघडी आहेत.२. सबस्टेशनच्या दरवाजांना कुलूप नाहीत.३. सबस्टेशनमध्ये रोजंदारीवरील कामगार मुक्काम करत आहेत.४. सबस्टेशनमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणारांचा अड्डा झाला आहे.५. वीजवाहक वायरही अनेक ठिकाणी नादुरुस्ती आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील विद्युत डीपी बॉक्सच्या देखभालीची जबाबदारी विद्युत विभागाची आहे. आम्ही वारंवार संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून येथील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. नियमितपणे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- अनिल चव्हाण, सचीव मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विद्युत यंत्रणा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 3:23 AM