नवी मुंबई : घर विकून गेलेल्या वीज ग्राहकाच्या नावे तब्बल ११ वर्षांनी थकीत बिल पाठवल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे. या थकीत बिलाच्या वसुलीसाठी वितरणकडून त्या ठिकाणी सध्या राहत असलेल्या वीज ग्राहकाला धारेवर धरले जात आहे.कोपरखैरणे सेक्टर ५ घर क्रमांक ७१ येथे राहणाऱ्या संतोष सणस यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी ११ वर्षांपूर्वी हे घर सुभाष डोरगे यांच्याकडून विकत घेतले आहे. हे घर घेतल्यानंतर त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी स्वत:च्या नावाची वीजजोडणी करून घेतली. त्यावेळी वितरणकडून देखील त्यांना कोणत्याही प्रकारच्या पूर्व थकीत बिलाची माहिती देण्यात आलेली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी जुन्या घरमालकाच्या नावाची नोटीस आली. त्यामध्ये ११ वर्षांपूर्वीचे थकीत १३ हजार ८०० रुपये भरण्याचे सुचित करण्यात आले होते. परंतु ज्यांच्या नावे नोटीस आलेली आहे ते सुभाष डोरगे हे त्या ठिकाणी राहत नसल्याचे त्यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन सांगितले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संतोष सणस यांनाच धारेवर धरले. जुने घरमालक हजर नसल्याने तुम्हीच त्यांच्या नावाचे थकीत बिल भरा अन्यथा घरावर जप्ती आणू, अशा प्रकारची धमकीही वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे सणस यांनी सांगितले.सणस यांनी सदर घर घेतल्यानंतर स्वत:च्या नावाचे वीजमीटर घेतले. त्यानंतर आजतागायत त्यांना वापरानुसार नियमित बिल प्राप्त होत असून, त्याचा भरणाही ते वेळेवर करीत आहेत. जर ११ वर्षांपासून त्या ठिकाणचे वीजबिल थकीत होते, तर यापूर्वीच बिलामध्ये तसे नमूद का केले नाही, असा प्रश्न सणस यांनी उपस्थित केला आहे. यावरून वीज वितरणकडून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार उघड होत आहे. (प्रतिनिधी)
एकाचे वीजबिल दुसऱ्याच्या माथी
By admin | Published: April 10, 2016 12:58 AM