सवलतीच्या दरात वीजजोडणी, गणेश मंडळांना अधिकृत विद्युत पुरवठा घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:42 AM2017-08-20T03:42:35+5:302017-08-20T03:42:48+5:30
गणेशोत्सवाकरिता काहीच दिवस उरले असून, मंडळांच्या वतीने वीजसुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याकरिता महावितरणच्या वतीने विशेष जनजागृती केली जात आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवाकरिता काहीच दिवस उरले असून, मंडळांच्या वतीने वीजसुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याकरिता महावितरणच्या वतीने विशेष जनजागृती केली जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन या माध्यमातून केले जात आहे. ४ रु पये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे आणि १ रु पया २१ पैसे वाहन आकार, तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत.
त्यामुळे धार्मिक उत्सवांसाठी आपल्या नजीकच्या कार्यालयामार्फत अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होत असल्याची माहिती महावितरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याशिवाय पावसाळी दिवस असल्याने, तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले; पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची दाट शक्यता असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता, मंडळाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत व गरजेनुसार त्यांच्याशी संपर्क साधावा. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.
घ्यावयाची काळजी
विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील, तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी.
अधिक माहितीसाठी, तसेच २४ तास सुरू असणाºया १९१२ किंवा १८००-२००-३४३५ अथवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.