देशी विदेशी लाखो पर्यटकांच्या गर्दीने बहरले एलिफंटा बेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 07:32 PM2023-12-31T19:32:35+5:302023-12-31T19:32:49+5:30
सणासुदीच्या आठ दिवसांत पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली
मधुकर ठाकूर
उरण : मागील १० दिवसांपासून सुट्ट्या, सणाच्या निमित्ताने गेटवे ऑफ इंडिया वरुन एलिफंटा बेटावर लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली आहे.नवीन वर्षांच्या पहिल्या आठवड्यापर्यत तरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचा वाढता ओघ कायमच राहणार असल्याची शक्यता आहे.मात्र रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेटवे ऑफ इंडियाला दिलेल्या भेटीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळीच एलिफंटा ,मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हजारो पर्यटकांचा खोळंबा झाला असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्था, मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान जलमार्गावरुन दररोज साधारणपणे दोन हजारपर्यत देशी-विदेशी पर्यटक घारापुरी लेणी पाहण्यासाठी येतात.सण, सुट्टीत यामध्ये थोडीफार वाढ होते.मात्र ख्रिसमस, थर्टी फर्स्ट,नवीन वर्षाच्या अगोदरपासूनच एलिफंटा बेटावर पर्यटनासाठी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीहूनही अधिक वाढली असल्याची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी दिली.तर एलिफंटाच बेटावरच नव्हे तर गेटवे ऑफ इंडिया येथुन मांडवा - अलिबाग जलमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे.त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांपासून एलिफंटा , अलिबाग -मांडवा या सागरी मार्गावरील प्रवाशांची वाहतूक तीन पटीने वाढली आहे.
त्यामुळे जलवाहतूकीवरही प्रचंड ताण पडला आहे.नवीन वर्षातही एलिफंटा बेटावर जाणाऱ्या पर्यटकांचा वाढता ओघ कायम राहणार असल्याची शक्यताही मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला आणि मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.तर मागील ८-१० दिवसांपासून घारापुरी बेटावर देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ दुपटीहून अधिक वाढला असल्यामुळे कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या सुरक्षा यंत्रणांवरही प्रचंड प्रमाणात ताण वाढला असल्याचे घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.
उरण येथील पीरवाडी बीच, पीरवाडी दर्गा आदी ठिकाणी पिकनिकसाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांच्या संख्येत मागील आठ-दहा दिवसांपासून वाढ झाली आहे.त्यामुळे भाऊचा धक्का -मोरा या सागरी मार्गावरील प्रवाशांच्या वाहतूकीतही दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक एन.एस.कोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांमुळे हजारो पर्यटकांचा तीन तास खोळंबा
गेटवे ऑफ इंडियाच्या मुंबई येथील ऐतिहासिक स्मारकाला रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच भेट दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान सूरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद ठेवण्यात आला होता. यामुळे तीन तास सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने एलिफंटा, मांडवा येथे जाणाऱ्या हजारो पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी ११ वाजल्यानंतरच एलिफंटा, मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला यांनी दिली.