नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई या दोन महानगरांच्या मधोमध असलेल्या जगप्रसिद्ध घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावरील जेट्टीलगत असलेल्या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. घारापुरी बेटावर असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी आणि तेथील शिवलिंगच्या दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी १० लाखांहून पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी येथील जेट्टीलगत असलेल्या शेतबंदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा निर्णय आता गृह विभागाने घेतला असून त्यासाठी ३८ कोटी ६७ लाख २७ हजार ८७७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शेतबंदर (घारापुरी) हे गाव एलिफंटा बेटावर वसलेले असून हे बेट मुंबईपासून नऊ सागरी मैल अंतरावर आहे. या लहान बेटाच्या आजूबाजूला सर्वत्र समुद्राचा वेढा असल्याने येथे ये-जा करण्यासाठी जलमार्गानेच प्रवास करावा लागतो. येथील शिवकालीन लेणी पाहण्यासाठी वर्षभरात सुमारे १० लाखांहून अधिक पर्यटक ये-जा करतात.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान- घारापुरी लेणी जागतिक प्रेक्षणीय स्थळ असून युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्कांच्या यादीत आहे. येथील जेट्टीला लागून असलेला बंधारा हा विस्कळीत झालेला असून तो ठिकठिकाणी तुटलेला आहे. पर्यटकांची वाढती गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून त्याची दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. याबाबत घारापुरी बेटावर पाच गावांतील स्थानिक रहिवासी, पर्यटक आणि बंदर विभागाने गृहविभागाकडे वारंवार मागणी केली आहे. अखेर तिची दखल घेऊन उशिरा का होईना आता शेतबंदर बंधाऱ्याची दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी ३८ कोटी ६७ लाख २७ हजार ८७७ रुपयांच्या खर्चास गेल्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता दिली आहे.
पर्यावरण परवानगीनंतर कामास सुरुवात- गृह विभागाने शेतबंदर बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी आवश्यक खर्चास मान्यता दिल्याने आता मेरिटाइम बोर्डास आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीची मान्यता घेऊन आणि राज्य आणि केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन करता येणार आहे. मेरिटाइम बोर्डास स्वनिधीतूनच का खर्च करावा लागणार आहे.