पनवेल : पनवेल शहरातून जाणाºया इलेव्हेटेड पुलाला गळती लागली आहे. मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होणे थांबले आहे. पाणी वाहून नेणारी यंत्रणा निष्फळ ठरल्याने हे पाणी पुलावरून थेट मुख्य रस्त्यावर पडत आहे. त्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागतो.
या उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी मोठी जलवाहिनी आहे; परंतु या वाहिनीची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. तसेच रिक्षाचालकांनी रस्त्यावर कब्जा केल्याने या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक बगल दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.