एलिव्हेटेड रस्ता झाला चकाचक
By admin | Published: August 28, 2015 11:22 PM2015-08-28T23:22:28+5:302015-08-28T23:22:28+5:30
रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात
पनवेल : रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात भिकारी, गर्दुल्ल्यांनी याठिकाणी कब्जा केला. या एलिव्हेटेड पुलाच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
माती, कचरा, गवत काढण्याचे काम आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. त्याचबरोबर लवकर पुलावरही सफाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पनवेल शहरातून जाणाऱ्या या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळण्यासाठी गार्डन हॉटेल ते तक्कादरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात आला. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. निधीअभावी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एलिव्हेटेड रोडला निधी दिला. त्यानुसार हा पूल उभारण्यात आला असून दोन वर्षांपूर्वी वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले असले तरी त्याचे वीजबिल भरण्याकरिता महामंडळाने हात वर केले. त्यामुळे कित्येक महिने हा रस्ता अंधारात होता. पनवेल नगरपालिकेने बिलाची जबाबदारी उचलल्याने पुलावरील पथदिवे उजळले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसात वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले होते. याच महामार्गावर शेडूंग येथे आयआरबी टोल वसूल करते. त्यामुळे पनवेल शहरातून जाणाऱ्या महामार्गाची देखभाल करणे या एजन्सीची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा त्रास पनवेलकरांना होत होता. (वार्ताहर)
शहरात नालेसफाई: पनवेल बसस्थानक ते गार्डन हॉटेल या दरम्यानचा परिसर स्वच्छ करण्याचे काम जवळपास झाले आहे. बसस्थानक बाजूच्या पावसाळी नाल्याची सफाई करण्यात आली. वास्तविक ही जबाबदारी एमएसआरडीसीची होती मात्र पनवेलकरांच्या हिताकरिता हे काम केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहने घसरतात : पुलावरील पावसाचे पाणी खाली जावे याकरिता ठिकठिकाणी जागा ठेवण्यात आली आहे. मात्र त्यात माती आणि कचरा बसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहात आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात.