लालफितीत अडकलाय ‘हार्बर’चा उन्नत मार्ग; विमानतळासह मेट्रोला देणार होते जोडणी
By नारायण जाधव | Published: June 27, 2024 10:19 AM2024-06-27T10:19:02+5:302024-06-27T10:19:49+5:30
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत.
नारायण जाधव
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यांची गरज पाहता, या मार्गावर धिम्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ केली जात असली, तरी वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकलसंख्या अपुरी पडत आहे. यामुळे हार्बरवर उन्नत मार्गाचा प्रस्ताव आला होता. मात्र, तो १४ वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.
सीएसएमटी ते पनवेल हे ४९ किलोमीटर आहे. लोकल प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. उन्नत मार्गिका झाल्यास हाच प्रवास ४५ मिनिटांत होईल, असे रेल्वेने तेव्हा स्पष्ट केले होते. या मार्गाचा केवळ ३० टक्के भाग हार्बर मार्गावरून जाणार होता, तर उर्वरित मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार होती. रेल्वेसह राज्य सरकार आणि सिडकोने सहकार्याची तयारी दर्शविली. उन्नत मार्गासाठी वाशी खाडीवर पूल उभारून हा मार्ग पुढे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळासह मेट्रोलाही जोडण्याचे नियोजन होते.
केंद्रीय मंत्रिमंडळानेही २०१९ मध्ये दिली मंजुरी
या प्रकल्पात १२६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मार्गिका बांधली जाणार होती. पुढे या मार्गाचा एमयूटीपी ३ ए मध्ये समावेश करून २०१८ च्या अर्थसंकल्पात तो प्रस्तावित करण्यात आला. नंतर त्याला मार्च २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली.