एलिव्हेटेड मार्ग आले दृष्टिपथात
By admin | Published: July 7, 2015 02:26 AM2015-07-07T02:26:17+5:302015-07-07T02:26:17+5:30
शहरातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाशी-उलवे आणि वाशी-ऐरोली या दोन एलिव्हेटेड मार्गांना राज्याच्या पर्यावरण विभागाने
कमलाकर कांबळे नवी मुंबई
शहरातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाशी-उलवे आणि वाशी-ऐरोली या दोन एलिव्हेटेड मार्गांना राज्याच्या पर्यावरण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. या दोन्ही मार्गाचा विस्तृत आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र कोस्टल मॅनेजमेंट अॅथॉरिटीने महापालिकेला केल्या आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे प्रकल्प दृष्टिपथात आले आहेत.
सध्या पामबीचवर वाहतुकीचा ताण वाढतो आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रस्तावित विमानतळामुळे यात आणखी भर पडणार आहे. हे लक्षात घेवून महापालिकेने शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून वाशी ते ऐरोली व वाशी ते उलवे असे दोन एलिव्हेटेड रस्ते बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. वाशी रेल्वे स्थानक ते थेट उलवेपर्यंतचा २0 किमी लांबीचा हा रस्ता उन्नत अर्थात एलिव्हेटेड स्वरूपाचा असणार आहे. तो बनविण्यासाठी मोठ्याप्रमाणात खारफुटी तोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे वाशी-ऐरोली दरम्यानच्या ११ किमी लांबीच्या मार्गातही खारफुटीचा अडथळा आहे. त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेने त्यासाठी एमसीझेडएकडे प्रस्ताव पाठविला होता. एमसीझेडएने त्यास अलीकडेच हिरवा कंदील दाखवत या बहुद्देशीय प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. तसेच या दोन्ही मार्गांचा प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. प्रस्तावित विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाशी-उलवे दरम्यानचा प्रस्तावित मार्ग उपयुक्त व सोयीचा ठरणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरून दिवसाला सुमारे दीड ते दोन लाख वाहने ये-जा करतात. यापैकी काही वाहने सरळ पनवेलमार्गे पुढे जातात, तर काही ठाण्याच्या दिशेने जातात. इतकेच नव्हे, तर ठाण्याकडे जाणारी वाहने वाशीमार्गे पुढे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या उपनगरातून जातात.