सिडकोच्या अकरा कर्मचाऱ्यांनी केली सिडकोचीच फसवणूक; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:14 AM2020-03-14T06:14:53+5:302020-03-14T06:15:09+5:30
सोसायटीसाठी भूखंड मिळवून घातला विकासकाच्या घशात
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : सिडकोच्या कर्मचाऱ्यांनीच मिळून सिडकोची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये सिडकोच्या तत्कालीन अधिकाºयांसह कर्मचाºयांचाही समावेश आहे. त्यांनी कर्मचाºयांच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी भूखंड मिळवून तो विकासकाच्या घशात घातला होता.
सिडकोच्या तीस कर्मचाºयांनी एकत्रित येऊन स्नेहपुष्प को-आॅप. सोसायटी स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १९९४ साली सिडकोकडे भूखंडासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २००२ मध्ये भूखंडाचे ७३ लाख ७९ हजार ३१० रुपये भरल्यानंतर त्यांना नेरूळ सेक्टर ४० येथील ९ व १० क्रमांकाचा भूखंड त्यांना केवळ निवासी वापरासाठी वितरित करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याच्या अनुषंगाने बनावट कागदपत्रे तयार करून ती सिडकोकडे सादर केली होती. त्याची कल्पना असतानाही तत्कालीन सिडको अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष करून भूखंडाचे वाटप केले. त्यामध्ये प्रस्तावित गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी व तत्कालीन सिडको अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. केवळ सिडको कर्मचाºयांसाठी गृहनिर्माण सोसायटी बनवली असतानाही त्यामध्ये सभासद म्हणून विकासकाला घेण्यात आले होते. त्यानंतर भूखंडाची ७३ लाखांची रक्कमदेखील त्याच विकासकाने सिडकोकडे भरली होती. याकरिता त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती सिडकोकडे सादर केली होती. त्याद्वारे सोसायटीसाठी भूखंड मंजूर करून त्याचा पूर्णपणे ताबा खासगी विकासकाला देण्यात आला. विकासकाने त्या ठिकाणी वाणिज्य व निवासी वापरासाठी इमारत उभारली असता सिडको अधिकाºयांच्या पाहणीत ही बाब समोर आली. मात्र मागील काही वर्षांपासून सदर इमारतीचे बांधकामही अर्धवट स्थितीमध्ये आहे.
अठरा वर्षांनी प्रकरण उघड
सिडको कर्मचाºयांनीच गृहनिर्माण संस्थेच्या नावे अल्पदरात भूखंड मिळवून तो विकासकाला विकल्याची बाब अठरा वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधितांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये सिडकोच्या तत्कालीन सहायक वसाहत अधिकाºयांसह, तत्कालीन क्षेत्राधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. सिडकोकडून गृहनिर्माण संस्थांना भूखंड दिले जात असल्याची संधी साधून सिडकोच्याच कर्मचाºयांनी एकत्रितरीत्या हा भूखंडाचा अपहार केला आहे.