नवी मुंबई : एमएमआरडीएच्या माध्यमातून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या नवनगर प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या.
राज्य शासनाने सादर केलेल्या नवनगर प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्यात अनेक त्रुटी असून त्यामुळे येथील ग्रामस्थांची शंभर टक्के जमीन हिरावून घेतली जाणार असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदविला आहे.
सिडकोच्या खोपटा प्रकल्पातील ३२ आणि नैना क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० अशा १२४ गावांचा समावेश करून नवनगर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४ मार्चपासून हरकती मागविल्या आहेत. या विभागातील ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून हरकती सादर केल्या.
नवी मुंबई प्रकल्पासारखी स्थिती होण्याची भीतीमुंबई पारबंदर प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी नवनगर प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. याअंतर्गत अधिसूचित १२४ गावांतील जमिनीसंपादित केल्या जाणार आहेत. नवी मुंबई प्रकल्पात झाले, तेच या नवनगर प्रकल्पात होण्याची शक्यता आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
३ एप्रिलपर्यंतची मुदत बुधवारी कोकण भवन येथील सहसंचालक नगररचना कार्यालयात जवळपास सहा हजार हरकती सादर केल्या. शेतकऱ्यांनी नगर रचना विभागाच्या सहसंचालकांकडे सादर केलेल्या अर्जात ९ मुद्यांवर हरकत नोंदविली आहे. हरकती नोंदविण्यासाठी ३ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. चार पाच दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.