सिडको विरोधात जासई प्रकल्पग्रस्तांचा एल्गार : रेल्वेचे काम बंद पाडण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 09:09 PM2023-09-14T21:09:39+5:302023-09-14T21:09:56+5:30
जासई मधील शेतकऱ्याना मागील २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद करण्यात आले होते.
मधुकर ठाकूर
उरण: नेरूळ ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आली असून त्याच्या मोबदल्यात दिले जाणारे साडेबारा टक्के भूखंड महिनाभरात न दिल्यास जासई मार्गावरील रेल्वे स्टेशनचे काम बंद पाडण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी गुरुवारी बंदचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे.
जासई मधील शेतकऱ्याना मागील २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी २०२३ ला पूर्ण करण्याचा इरादा रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी सध्या या मार्गाच्या कामाने वेग धरला आहे. जमिनी सिडकोने संपादीत केल्या आहेत. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड देय आहेत. मात्र २२ वर्षे उलटून गेल्यानंतरही जासई मधील शेतकऱ्यांना सिडकोकडून वारंवार झालेल्या बैठकीतून पोलीस यंत्रणा व विविध आस्थापना समोर आश्वासने देऊन ते पूर्ण न केल्याने हे काम बंद करण्यात येणार आहे.
सातत्याने पाठपुरावा करून ही सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. हा अन्याय आहे. विकासाला विरोध नाही. मात्र आमच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड महिन्याभरात न दिल्यास रेल्वे आणि सिडको विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी सुरेश पाटील,रमाकांत पाटील,महादेव पाटील,माजी सरपंच धीरज घरत आदींसह शेतकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.