व्यापारी अन् शासनाविरोधात पर्ससीन मच्छीमारांचा एल्गार, बोटी बंद ठेऊन निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:31 PM2022-11-11T23:31:10+5:302022-11-11T23:32:06+5:30
ससुनडॉक बंदरात बोटी बंद ठेऊन निषेध
मधुकर ठाकूर
उरण : सातत्याने होणारी डिझेल दरवाढ,भडकती महागाई, १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना डिझेल कोटा देण्यासाठी शासनाकडून केलेली बंदी,
लिलावधारकांकडून होणारी लुबाडणूक, मासळीचे घसरते भाव त्यानंतरही समुद्रातील मासेमारीसाठी खर्च केलेली रक्कमही हाती नसल्याने शुक्रवारी मुंबई येथील ससुनडॉक बंदरात शेकडो पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी बोटी बंद ठेऊन शासनाविरोधात आपला राग व्यक्त केला.
राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर,ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवर पेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या मच्छीमार नौकांना शासनाने डिझेल कोटा बंद केला आहे. डिझेलचे कोट्यावधींचे थकित परतावेही मिळत नाहीत.त्यातच प्रत्येक १०-१२ दिवसांच्या एका ट्रिपसाठी १८ खलाशी, डिझेल,बर्फ,रेशन, पाणी आणि अन्य बाबींसाठी तीन लाखांहूनही अधिक खर्च होत आहे.मात्र त्यानंतर मासळीला लिलावदार, व्यापाऱ्यांकडून पुरेसा भाव मिळत नाही.सुरमई , तेल बांगडा,काट बांगडा,टूणा,नारबा आदी प्रकारच्या मासळीचे भावात निम्म्याने घसरले आहेत.यामध्ये निर्यातदार,लिलावदार, व्यापाऱ्यांकडून मच्छीमारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात आहे.यामुळे एका ट्रिपसाठी खर्च केलेली रक्कम मच्छीमारांच्या हाती लागत नाही.यामुळे मच्छीमारांवर
उपासमारीचे संकट आले आहे.
१२० अश्वशक्ती इंजिनवरील मच्छीमार नौकांना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय रद्द करुन डिझेल कोटा पुर्ववत सुरू करणे, मच्छीमारांना कोट्यावधींची थकित असलेल्या डिझेल परताव्याची रक्कम अदा करण्यात यावी,मासळीला योग्य भाव मिळावा, निर्यातदार,लिलावदार व व्यापाऱ्यांकडून मच्छीमारांची होणारी लुबाडणूक थांबविण्यात यावी, यासाठी शुक्रवारी (११) मुंबई येथील ससुनडॉक बंदरात शेकडो पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या शेकडो मच्छीमारांनी बोटी बंद ठेऊन शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यामध्ये मुंबई, मोरा,करंजा, दिघोडे, रेवस, ट्रॉम्बे, माहुर,ठाणे येथील मच्छीमार बोटींचा समावेश होता. मच्छीमारांच्या समस्यांचा वेळेत निपटारा करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणीही मुंबई पर्ससीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा, संचालक रमेश नाखवा, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष सिताराम पटेकर यांनी या बंद दरम्यान केली आहे. तसेच या विरोधात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी करंजा येथे तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीतच आंदोलनाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.