नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाशीतील डेडिकेटेड कोविड रुग्णालयास शुक्रवारी अचानक भेट दिली. रुग्णालयातील उणिवा दूर कराव्या व पुरेसा औषधसाठा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
आयुक्तांनी वाशी रुग्णालयातील कामकाजाचा व उपचार पद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये त्यांनी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबतही सविस्तर माहिती घेतली व त्यामधील त्रुटी दूर करण्याबाबत निर्देश दिले. डेडिकेटेड कोविड रु ग्णालयात गंभीर स्वरूपाची लक्षणे असणारे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने, त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे व त्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे सूचित केले. कोणत्याही रुग्णास दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करावयाचे असल्यास, अथवा घरी पाठवायचे असल्यास, त्यांच्याकरिता विनाविलंब रुग्णावाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या.