सुरक्षारक्षकाच्या कष्टाच्या पैशांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:47 AM2018-03-17T02:47:18+5:302018-03-17T02:47:18+5:30
एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत.
नवी मुंबई : एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. कष्टाचे पैसे परत मिळावे यासाठी सुरक्षारक्षक बँकेसह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे घालत असून न्याय मिळावा यासाठी सर्वांना साकडे घालत आहे.
सुरक्षारक्षक बोर्डाच्यावतीने एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या विकास भिलारे यांचे युनियन बँकेमध्ये खाते आहे. २५ फेब्रुवारीला त्यांनी बँकेच्या कोपरखैरणेमधील एटीएम सेंटरमधून ३ हजार रूपये काढले होते. यानंतर एटीएममधून पैशांचा अपहार करणाऱ्या टोळीने १२ मार्चला त्यांच्या एटीएममधून कोपरखैरणे एटीएममधूनच दहा हजार रूपये काढले. थोड्या वेळामध्ये पुन्हा दहा व नंतर पाच हजार असे एकूण २५ हजार रूपये काढले. पुन्हा याच दिवशी ४ हजार, दोन वेळा दहा हजार व पुन्हा ५ हजार रूपये काढले. एकाच दिवशी बँक खात्यामधून तब्बल ५४ हजार रूपये काढले. १३ मार्चला एकाच दिवशी ४६ हजार ८९९ रूपये बँकेतून काढले. दोन वेळा दहा हजार, एकवेळ पाच हजार, १२९०० व ८९९९ रूपये बँकेतून काढले. तिसºया दिवशी एटीएममधून पुन्हा २५ हजार रूपये काढण्यात आले असून बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रूपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रूपये कोणीतरी काढले आहेत.
भिलारे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्याची गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेत जावून याविषयी विचारणा केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही व सायबर सेलकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणणे ऐकून घेतले व पुन्हा बँकेत जावून औपचारिकता पूर्ण करण्यास सांगितले.
या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बँकेनेही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. भिलारे यांनी त्यांच्या वेतनातून पैसे वाचवून ठेवले होते. काटकसरीने खर्च करून भविष्यासाठी ठेवलेले पैसे गेल्यामुळे त्यांना धक्का बसला असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.
टोळी सक्रिय
बँक खाते हॅक करून पैसे हडपणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. घणसोली सेक्टर ७ मध्ये राहणाºया वर्षा गोळे यांच्या यांच्या इंड्सइंड बँक खात्यातून एक लाख रूपये काढले आहेत. बंगळुरूमधून हे पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलारे यांच्या खात्यातूनही बंगळुरूमध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
>एवढे पैसे निघाले कसे
भिलारे यांच्या बँक खात्यातून तीन दिवसामध्ये १ लाख ५० हजार रूपये गेले आहेत. पहिल्या दिवशी ५४ हजार, दुसºया दिवशी ४६ हजार व तिसºया दिवशी २५ हजार रूपये काढण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना दिवसा जास्तीत जास्त दहा ते २५ हजार रूपये काढता येतात. पण ५० हजार पेक्षा जास्त पैसे काढल्याने बँकेच्या सुरक्षा यंत्रणेविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.
>बँकेसह पोलिसांची उदासीनता
सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यातून तीन दिवसात दीड लाख रूपये गेले. घणसोलीमधील एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाख रूपयांचा अपहार झाला. दोन्ही प्रकारामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बँकांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.
>कष्ट करून साठविलेल्या पैशातील दीड लाख रूपये तीन दिवसांत चोरट्यांनी हडप केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडावे व बँकेने पैसे परत मिळवून द्यावे एवढीच अपेक्षा आहे.
- विकास भिलारे, सुरक्षारक्षक