अनंता पाटील
नवी मुंबई : शिधावाटप दुकानातून अन्नधान्याचा होणारा अपहार आता नवीन बाब राहिलेली नाही. परंतु लॉकडाउनमध्येसुद्धा हा प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले आहे. ऐरोली येथील एका शिधावाटप दुकानदाराने एका शिधापत्रिकाधारकाचा हक्क डावलून त्याच्या वाट्याचे अन्नधान्य काळ्याबाजारात इतरांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिधावाटपकधारकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.ऐरोली सेक्टर ४ येथे दुकान क्रमांक ४१फ/२२४ हे शिधावाटप दुकान आहे. या दुकानात येथील रहिवासी स्वप्निल डोके यांच्या कुटुंबाचे रेशनिंग कार्ड आहे. लॉकडाऊन कालावधीत डोके आपल्या कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी गेले होते. या काळात त्यांच्या रेशनकार्डवर मिळणारे धान्य एका त्रयस्थ व्यक्तीस वाटप केल्याचे आॅनलाइनवरील नोंदीवरून उघड झाले आहे. गावावरून आल्यावर डोके धान्य घेण्यासाठी दुकानावर गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.सध्याच्या कोरोनासदृश परिस्थितीत जनतेला अन्नधान्याची अत्यंत आवश्यकता असताना प्रत्येक कार्डधारकांना तसेच शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनाही केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने लाभार्थींना नियमानुसार धान्यपुरवठा करण्याची तरतूद केली आहे.असे असताना या शिधावाटप दुकानदाराने मूळ लाभार्थी असलेल्या स्वप्निल डोके यांच्या नावावर १० मे २०२० रोजी १५ किलो गहू व १० किलो तांदूळ तर २९ मे २०२० रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळालेले २५ किलो तांदूळ इतरांना वाटप केल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी या परिसरातील रहिवाशांनी या दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आता एका शिधापत्रिकेवरील धान्य परस्पर दुसऱ्याला दिल्याचा प्रकार समोर आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.> ऐरोली सेक्टर ४ येथील या शिधावाटप दुकानदाराने धान्यवाटपात काळाबाजार केला असेल तर नियमानुसार या दुकानावर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.- नरेश वंजारी,उपनियंत्रक, फ परिमंडळ,शिधावाटप कार्यालय, ठाणे