सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : वाशी येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या बांधकामावेळी आपत्कालीन जिन्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी लोखंडी जिना बसवण्यात आला आहे. त्यातही नियोजनाचा अभाव व सुरक्षेच्या बाबींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपत्कालीन जिनाच आपत्कालीन परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून वाशी येथील अग्निशमन केंद्रासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. या अग्निशमन केंद्राचा वरचा मजला प्रशासकीय कार्यालयांसाठी बनवण्यात आला असून, सध्या तेथे वाशी विभागाचे विद्युत, पाणीपुरवठा व अभियांत्रिकी कार्यालय चालत आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन केंद्राच्या आतील बाजूस लोखंडी जिना बसवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बेसमेंट पार्किंग बनवण्यात आले आहे, त्याच्याच वरच्या भागावर हा आपत्कालीन लोखंडी जिना बसवला आहे. त्यासाठी बेसमेंटच्या छताला खालील बाजूने लोखंडी पट्टीचा नटाद्वारे आधार देण्यात आला आहे. जिना उभारताच तिथल्या बीमच्या भागाला तडादेखील गेला होता. यामुळे १०० टनाहून अधिक वजनाच्या जिन्याचा भार बेसमेंटचे छत किती काळ पेलू शकेल याबाबत शंका आहे. विशेष म्हणजे बेसमेंटच्या वरच्या भागावर अग्निशमन दलाची ३५ टन वजनाची ‘ब्रँटो’ गाडी उभी करण्यास मनाई आहे. यानंतरही त्या ठिकाणी लोखंडी जिना उभारलाच कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून पालिका अधिकाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधला १०० टनाचा लोखंडी जिना
n इमारतीचे बांधकाम करताना त्या ठिकाणी आपत्कालीन जिना उभारण्याचा विसर पडला असावा. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुमारे १०० टनाचा हा लोखंडी जिना बसवण्यात आला आहे.
n बांधकामाच्या रचनेनुसार तीस मीटर अंतरावर दोन जिने आवश्यक आहेत. परंतु आराखड्यात आपत्कालीन जिन्याचा विसर पडल्याने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्य जिन्याला लागूनच तो बसवण्यात आला.
n मात्र खासगी बांधकामातील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्याच बांधकामातील त्रुटी दिसल्या नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिस्थिती बिघडल्यास बाधावास्तविक हा जिना आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी बसवला असून, तो जिनाच आपत्कालीन परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.