महापालिका कर्मचाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:01 AM2020-02-07T00:01:54+5:302020-02-07T00:02:34+5:30
आपत्ती छोटी असो वा मोठी, त्यामध्ये सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न असणे व त्या प्रयत्नांमध्ये परस्पर समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई : आपत्कालीन परिस्थितीमध्ये दक्षता राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुणे येथील यशदा आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्या सहयोगाने महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आपत्ती व्यवस्थापनसंबंधीची कार्यप्रणाली या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद आपत्ती व्यवस्थापनाविषयी माहितीसंपन्न असावा, या दृष्टीने प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले. यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र संचालक कर्नल विश्वास सुपनेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषयही इतर अनेक विषयांमध्ये व्यस्त असल्यामुळे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.
आपत्ती छोटी असो वा मोठी, त्यामध्ये सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न असणे व त्या प्रयत्नांमध्ये परस्पर समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दोन दिवसीय प्रशिक्षणातून पालिकेचा अधिकारी, कर्मचारीवृंद आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्कालीन कक्ष सक्षम केल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पाटील यांनी दिली.