नवी मुंबई : भारतीय वकिलातींच्या ११ राजदूत आणि उच्चायुक्तांनी बुधवारी सिडकोच्या मुंबई येथील निर्मल कार्यालयाला भेट दिली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यानंतर सिडकोच्या कामांची व प्रकल्पांची या शिष्टमंडळाला माहिती दिली. यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो आदी प्रकल्पांचा समावेश होता.या शिष्टमंडळात सौदी अरेबियाचे भारतीय राजदूत अहमद जावेद, रशियाचे पंकज सरन, कोलंबियाचे रवी बांगर, आॅस्ट्रेलियाचे डॉ. अजय गोंडणे, बेलारूसच्या संगीता बहादूर, डेन्मार्कचे अजित गुप्ते,ट्युनिशियाचे प्रशांत पिसे, फिजीचे विश्वास सपकाळ, कोरियाचे अतुल गोतसुर्वे व तुर्कमेनिस्तानचे भारतीय राजदूत अझहर ए.एच.खान उपस्थित होते. यावेळी राज्याचे प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी बिजूर व कक्ष अधिकारी संजय कोरगांवकर हे सुध्दा उपस्थित होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचे ध्वनीचित्राच्या माध्यमातून सादरीकरण केले. विदेशातील नागरी विकासाचा आधार सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांत राबविला जावू शकतो, असे मत उपस्थित राजदूतांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सिडकोचा नगर विकास व नगर नियोजनामधील अनुभव पाहता सिडकोने परदेशात देखील सल्लागार म्हणून काम पाहावे, अशी सूचना राजदूतांनी केली. परदेशातील विविध नगर नियोजन पध्दतीचा अवलंब सिडकोने आपल्या प्रकल्पात करण्याच्या सूचनाही यावेळी शिष्टमंडळाने सिडकोला केल्या.
वकिलातींच्या राजदूतांची सिडकोला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:17 AM