कळंबोली : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पनवेल महापालिकेसह ग्रामीण भागात पक्षाची मोट बांधण्यास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणिस खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवात केली आहे. त्याकरिता कळंबोली येथील सुधागड विद्या संकुल सभागृहात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला.पनवेल महापालिकेसह ग्रामिण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळंबोली येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षवाढीवर भर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक समस्या सोडविण्यासह गावपातळीवर संघटन करण्यास कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. कोरोनामुळे पनवेल महापलिका क्षेत्रात आलेल्या संकटावर मात करत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध समस्यांचे निरासन करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. भविष्यात पनवेल महापालिकासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. त्याकरिता कार्यकर्त्यांनी उत्साहात कामाला सुरुवात करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या. या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश भाऊ लाड, पनवेल जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, सुरदास गोवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पनवेल परिसरात पाय रोवणार : पनवेल, उरण परिसरात राष्ट्रवादीचे वारे वाहायला लागले आहेत. येथील स्थानिक कामे, समस्या सोडविण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत शेकापला आपले वर्चस्व प्रस्तापित करता आले नाही. तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात राष्ट्रवादीने पाय रोवून पक्ष संघटन करण्यासाठीच कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आल्याचे खासगीत बोलले जात आहे.
ग्रामीण भागात पक्ष बळकटीवर भर; कळंबोलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:04 AM