वंडर्स पार्कमधील कर्मचाऱ्यांची पिळवणूक
By Admin | Published: March 28, 2016 02:32 AM2016-03-28T02:32:09+5:302016-03-28T02:32:09+5:30
नेरूळमधील वंडर्स पार्कमधील पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून पिळवणूक सुरू आहे. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्या दिल्या जात नाहीत. सण, उत्सवामध्येही
नवी मुंबई : नेरूळमधील वंडर्स पार्कमधील पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून पिळवणूक सुरू आहे. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्या दिल्या जात नाहीत. सण, उत्सवामध्येही कामावर यावे लागत आहे. सुटी दिवशी केलेल्या जादा कामाचा मोबदला देण्याचे आश्वासन देवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे.
महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २४ ते २७ मार्च अशा चार दिवस सुट्या होत्या. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे व त्यांच्यासारखे काही प्रामाणिक कर्मचारी वगळता इतर सर्वांना दुसरा व चौथा शनिवार, प्रत्येक रविवार व सर्व सुट्या मिळत असतात. परंतु या नियमाला नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपवाद आहे. येथे तिकीट विक्रीपासून इतर महत्त्वाची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. डिसेंबर २०१२ मध्ये उद्यानाचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हापासून या कर्मचाऱ्यांना सोमवारी साप्ताहिक सुटी दिली जात आहे. दुसरा व चौथ्या शनिवारची सुटी रद्द झाली आहे. मनपा कर्मचारी उत्सव कुटुंबियांसोबत साजरा करतात. परंतु वंडर्स पार्कमधील कर्मचारी सणाच्या दिवशीही त्यांचे कर्तव्य बजावत असतात.
वंडर्स पार्कमधील कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला दिला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जादा कामाचाही मोबदला दिला जाणार होता. परंतु तब्बल तीन वर्षे त्यांना फक्त आश्वासनच दिले जात आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी वंडर्स पार्क बंद ठेवले जात होते. परंतु यावर्षी फूड कोर्ट चालकाच्या आग्रहास्तव उद्यान सुरूच ठेवण्यात आले. यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षा रक्षकांचीही कसरत
वंडर्स पार्कमध्ये सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुटीही दिली जात नाही. वास्तविक कायद्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांनाही ८ तासांची ड्युटी दिली पाहिजे. परंतु याठिकाणी कामगारांना १२ तास काम करावे लागत आहे.
सुटी न घेता सलग काम केल्यामुळे त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्यावर होवू शकतो. नोकरी गमावण्याच्या भीतीने सुरक्षा रक्षक कोणतीही तक्रार न करता १२ तास कर्तव्य बजावत आहेत.