श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले
By नामदेव मोरे | Published: March 7, 2024 03:09 PM2024-03-07T15:09:47+5:302024-03-07T15:10:11+5:30
मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले
अयोध्या: प्रभु श्रीराम मंदिरामुळे अयोध्येमधील रोजगारामध्ये प्रचंड वाढ होत आहे. स्थानिक नागरिकांच्या हाताला काम मिळत आहे. रोजी- रोटी साठी मुंबईत आलेले मजुरांची घरवापसी सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करणा-या अनेकांनी पुन्हा अयोध्येमध्ये येणे पसंत केले असून चहा, अल्पोपाहारापासून कपडे विक्रीपर्यंत जमेल तो व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे.
श्रीराम मंदिरामुळे संपूर्ण अयोध्येचा कायापालट होत आहे. शहर सुशोभिकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त दर्शनासाठी येत आहेत. रोज दोन ते तीन लाख नागरिक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. यामुळे येथील अर्थव्यवस्था बळकट होत आहे. व्यवसायामध्ये पाच पट वाढ झाली आहे. रोजगाराच्या संधीही वाढत असून त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना होत आहे. यापुर्वी रोजगाराच्या शोधात मुंबई, गुजरातसह देशाच्या विविध भागात गेलेले मजुर गावाकडे परत येत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व फळ बाजारात ही रोजंदारीवर अनेक मजुर काम करत होते. यामधील अनेकांनी पुन्हा अयोध्येला जाणे पसंत केले आहे. शरयु किनारी व अयोध्येत जिथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
शरयु घाटाच्या परिसरात चहा, कपडे विक्री करणा-या तरूणांनी आम्ही मुंबई बाजार समितीत अनेक वर्ष काम केले. श्रीराम मंदिरामुळे आता येथे संधी उपलब्ध झाल्यामुळे आम्ही गावाकडे परत आलो. येथे उत्तम व्यवसाय होत असल्याचे सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट मध्ये रोजंदारीवर काम करत होतो. राममंदिराचे काम झाल्यामुळे पुन्हा गावी आलो. येथे चहा विक्री चा व्यवसाय सुरू केला. माझ्याप्रमाणे अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. - विनोदकुमार वर्मा, चहा विक्रेता
अयोध्येत वर्षातून चार प्रमुख उत्सवाच्या काळात भावीकांची गर्दी असायची. रामनवमी, श्रावण. मार्गशीर्ष, चैत्र महिन्यात भावीक खूप यायचे. आता रोजच यात्रेचे स्वरूप येत आहे. व्यवसायात चार ते पाच पट वाढ झाली आहे.पुर्वी रोजगारासाठी बाहेर गेलेले नागरिक आता परत येवून स्वतःचा व्यवसाय करत आहेत - आनंद मिश्रा- कपडे व्यवसायिक