रोजगार मेळाव्यात ८७५० उमेदवारांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:36 AM2018-09-09T02:36:53+5:302018-09-09T02:36:57+5:30
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली.
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने नवी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल ८७५० उमेदवारांनी नाव नोंदणी केली. १७५ कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दिवसभरामध्ये ३३०६ जणांच्या मुलाखती होऊन १६०२ जणांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे रोजगार मेळावे घेतले जाणार असल्याचे यावेळी उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
वाशी रेल्वे स्टेशनसमोरील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रात ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सीआयआय या उद्योग संघटनांचा या उपक्र मात सहभाग होता. सुभाष देसाई यांनी प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारचे मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून यापूर्वी एअर इंडिया, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नाव या रोजगार मेळाव्याला दिले आहे. राज्यात गुंतवणूक वाढत असून रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व कल्याण परिसरामध्येही अशाप्रकारचे मेळावे आयोजित करावे अशी सूचना केली. रोजगार मेळाव्यामुळे एकाच छत्राखाली विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्यामुळे या मेळाव्यांची गरज असल्याचे स्पष्ट केले. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही रोजगार इच्छुकांनीही संकुचित वृत्ती सोडून आणि केवळ तात्कालिक विचार न करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले आहे.