भिकाऱ्यांचे महामार्गावर अतिक्रमण, सानपाड्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:31 PM2018-10-25T23:31:56+5:302018-10-25T23:32:09+5:30
सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य रोडवरही मोठ्या संख्येने अनेक जण बसलेले असतात, अशीच स्थिती राहिली तर अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सानपाडा उड्डाणपुलाखाली अनेक महिन्यांपासून भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. महापालिका व पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ५०० पेक्षा जास्त भिकारी पुलाखाली व बाजूच्या पदपथावर वास्तव्य करत आहेत. अनेक जण महामार्गावर रोडवरच घोळका करून थांबू लागले आहेत. पदपथ व मुख्य रोडवर बसलेल्या या नागरिकांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वाहनचालकाचा ताबा सुटला, तर एकाच वेळी ४० ते ५० नागरिक चिरडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांनी या विषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अपघात झाल्यास चालकांना दोषी धरले जाण्याची शक्यता आहे, यामुळे वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस स्टेशनसह महानगरपालिकेने अतिक्रमण करणाºयांना येथून हाकलावे, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे.
भिकाºयांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहेच, याशिवाय या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी भीक न दिल्यामुळे २० ते २५ भिकाºयांनी एका दुकानावर दगड मारण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका गृहनिर्माण सोसायटीमधील मंदिराची दानपेटीही चोरीला गेली होती. परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून, साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील भाजपाचे पदाधिकारी राजेश राय यांनी अनेक वेळा महापालिकेकडे याविषयी तक्रार केली आहे.
>महामार्गावर भिकारी बसू लागल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
५०० पेक्षा जास्त भिकाºयांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे.
भिकाºयांचा उपद्रव येथून ये-जा करणाºयांना होऊ लागला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.