सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण
By admin | Published: November 11, 2015 12:25 AM2015-11-11T00:25:14+5:302015-11-11T00:25:14+5:30
सिडकोने वितरीत न केलेल्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत इमारती उभारण्याचे काम शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐन दिवाळीत अशा अनधिकृत इमारतींमधील
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सिडकोने वितरीत न केलेल्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत इमारती उभारण्याचे काम शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐन दिवाळीत अशा अनधिकृत इमारतींमधील घरांची विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे.
दिघा येथील अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेतल्याने त्यावर कारवाईनंतर शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. तर इतरही अनेकांवर भविष्यात तेच संकट येण्याची शक्यता आहे. सदर प्रकारामुळे शहरातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत इमारती उभारण्याचे काम भूमाफियांकडून सुरुच असल्याचे दिसत आहे. खाजगी विकासकांमार्फत राबवल्या जाणाऱ्या या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून सिडकोचे वितरीत न झालेले भूखंड हडपले जात असल्याचा प्रकार सुरु आहे. अशा भूखंडावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. त्यामध्ये घणसोली, कोपरखैरणे तसेच बेलापूर येथील गावठाणलगत साडेबारा टक्के अंतर्गत वाटपासाठी ठेवलेल्या बहुतांश भूखंडांचा समावेश आहे. त्यापैकी कोपरखैरणे येथील एक प्रकार उघडकीस आला आहे. सेक्टर ११ येथील ११४ क्रमांकाच्या भूखंडावर ब्ल्यू व्हॅली नावाची चार मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आलेली आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून ऐन दिवाळीपूर्वी त्यामधील घरांची विक्री झालेली आहे. नव्या घराच्या शोधात असलेले अनेक जण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नव्या घरात रहायला जाणे पसंत करतात. यानुसार सदर इमारतीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून काहींनी गृहप्रवेश देखील केला आहे. सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांना त्यांना या घरांची विक्री झालेली
आहे.
काही खाजगी विकासक मिळून हा प्रकार करत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांच्या घणसोली येथील कार्यालयातून या घरांच्या विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. त्याठिकाणी अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असताना सिडकोनेही केवळ नोटीस देऊन त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याठिकाणी अनेकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेळीच बांधकाम पाडणे आवश्यक असतानाही तसे झालेले नाही. त्यामध्ये संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता आहे.
अशाच प्रकारे या भूमाफियांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बेलापूर, घणसोली व कोपरी येथे ८ ते १२ मजली इमारती उभारलेल्या असल्याचे देखील सूत्रांकडून समजते. यामुळे अनधिकृत इमारती उभारुन त्यामधील विकलेल्या घरांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे. शिवाय घरे घेणाऱ्या नागरिकांचीही फसवणूक केलेली आहे.