वाशीतील उद्यानाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:19 AM2019-12-29T00:19:51+5:302019-12-29T00:20:09+5:30
नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर; महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ मधील उद्यानाच्या बाहेर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. उद्यानात ये-जा करणाºया नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
नवी मुंबई शहरात वाहने पार्किंग आणि अनिधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गहन झाला आहे. शहरात वाहने पार्किंगचे नियोजन नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. फेरीवाल्यांसाठीदेखील योग्य नियोजन नसल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमणही वाढले आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अनिधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी होणाºया गर्दीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.