‘अतिक्रमणमुक्त शहर’ला हरताळ?
By admin | Published: September 11, 2016 02:39 AM2016-09-11T02:39:21+5:302016-09-11T02:39:21+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार फेरीवाले, मार्जिनल स्पेस, विनापरवाना होर्डिंग्ज
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार फेरीवाले, मार्जिनल स्पेस, विनापरवाना होर्डिंग्ज, बेकायदा बांधकामे आदींना प्रतिबंध घालण्याचे निर्देश संबधित विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु विभाग कार्यालयाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने आयुक्तांच्या या संकल्पनेला अप्रत्यक्षपणे हरताळ फासला असल्याचे दिसून आले आहे.
मागील दीड दशकात शहरात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली गेली आहेत. पदपथांवर फेरीवाल्यांना कब्जा केला आहे. व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसच्या जागा बळकावल्या आहेत. विनापरवाना होर्डिंगची बजबजपुरी झाली आहे. एकूणच सुनियोजित शहर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबईचा चेहरामोहरा पुरता बदलून गेला आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम या अनधिकृत प्रकाराला आळा घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्यात पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनापरवाना होर्डिंगबाजीला प्रतिबंध घातला. मार्जिनल स्पेसच्या जागा रिकाम्या केल्या. त्यांच्या या धडक कारवाईमुळे काही घटकांत नाराजीचे सूर पसरले असले तरी शहरवासियांकडून मात्र त्यांचे चांगलेच कौतुक झाले. विशेष म्हणजे ही मोहिमेत खंड पडू नये, यासाठी विभाग अधिकाऱ्यांना निर्देश देणयात आले. परंतु राजकीय दडपणाखाली काम करण्याची सवय लागलेल्या बहुतांशी विभाग अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला सोयिस्कररित्या बगल दिल्याचे पाहवयास मिळत आहे. याचा परिणाम म्हणून कारवाई करण्यात आलेल्या अनेक भागात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. व्यापाऱ्यांनी दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसवर हळूहळू पाय पसरायला सुरूवात केली आहे. बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच आहे.
जुहूगाव, कोपरखैरणे, कोपरी, घणसोली, गोठीवली तसेच सानपाडा, नेरूळ आदी गाव गावठाणांत आजही मोठ्याप्रमाणात फिफ्टी-फिफ्टीची बांधकामे सुरू आहेत. बैठ्या घरांचे विनापरवाना वाढीव बांधकाम बिनदिक्कत सुरू आहे. कोपरखैरणे विभागात तर अशा बांधकामांनी कळस गाठला आहे. परवानगी एका मजल्याची आणि बांधकाम तीन मजल्यापर्यंत असा जुना फंडा आजही या परिसरात सर्रास सुरू आहे. कोपरीगावात पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या जागांवर जुन्या वाहन विक्रींचा कार बाजार बिनदिक्कतपणे सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. या उत्सवाच्या आडून बेकायदा बांधकामांचा धडका सुरू असून यासंदर्भात संबधित प्रशासनाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याचे दिसून येते.