पनवेल : खारघर शहरात सिडकोच्या वतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून सिडकोची कारवाई सुरू असून, खारघरमधील नोंदणीकृत फेरीवाल्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, सिडकोने शहरातील फेरीवाल्यांना दिलेल्या २२ भूखंडांचे काय? त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करून फेरीवाल्यांचे तेथे पुनर्वसन करा, अशी मागणी खारघरमधील फेरीवाला व व्यापारी संघटनांनी केली आहे. खारघर एकता व्यापारी असोसिएशन, खारघरचा राजा व्यापारी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी पालिकाआयुक्त सुधाकर शिंदे याची भेट घेऊन, त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी अतिक्र मण हटविण्याची मोहीम तीव्र केली आहे. खारघरमध्ये फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. यापैकी अनेक फेरीवाले हे नोंदणीकृत फेरीवाले आहेत. सिडकोच्या मार्फत त्यांचा सर्व्हेही करण्यात आला आहे. सिडको मार्फत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी योग्य रीतीने झालेली नाही. यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सिडकोच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्या वेळी खारघरमधील एकूण २२ भूखंड फेरीवाल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. मात्र, या २२ भूखंडांवर दुसऱ्यांनीच कब्जा केला असून, त्या ठिकाणी रेती-विटांचे अतिक्र मण केल्याचा आरोप एकता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे.त्यामुळे सिडकोने फेरीवाल्यांसाठी भूखंड मोकळे करावेत, त्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करावी, यासाठी आयुक्त शिंदे यांनी सिडकोला आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवरील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांच्या भूखंडांवर अतिक्रमण
By admin | Published: December 23, 2016 3:31 AM