- नामदेव मोरे नवी मुंबई : पाम बीच रोडवर सानपाडाजवळील कोट्यवधी रुपयांचे मोक्याचे भूखंड झोपडीधारकांनी गिळंकृत केले आहेत. या परिसरामध्ये ३०० पेक्षा जास्त झोपडी उभ्या राहिल्या असून, परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचा वावरही वाढला आहे. नियमित होणाºया राडेबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.नवी मुंबईमधील सर्वात प्रमुख विभाग म्हणून पाम बीच रोडला लागून असलेल्या वसाहतींना ओळखले जाते. येथील भूखंडांना व त्यावर उभ्या केलेल्या इमारतींमधील घरांनाही विक्रमी किंमत मिळत आहे. श्रीमंतांची वसाहत म्हणूनही ओळख आहे. या परिसरामधील भूखंड झोपडीधारकांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. सानपाडा सेक्टर १९ जवळ असलेल्या महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राजवळील भूखंडावरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडी उभारण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये येथे जवळपास १०० झोपडी उभ्या आहेत. या ठिकाणी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनीही आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री या परिसरामध्ये वारंवार राडेबाजी सुरू असते. गुरुवारी रात्रीही या परिसरामध्ये मारामारी झाली होती. गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांनीही येथील काही झोपडींमध्ये आश्रय घेण्यास सुरुवात केली असल्याचे या परिसरातून ये-जा करणाºया नागरिकांनी सांगितले. अशाच प्रकारे राडेबाजी सुरू राहिली तर भविष्यात गंभीर घटना घडल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सिडकोने यापूर्वी येथील झोपडी हटवून भूखंडांना तारेचे कुंपण घातले आहे; परंतु कुंपण तोडून पुन्हा झोपडी बांधण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणाकडे सद्यस्थितीमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सातत्याने कारवाई होत नसल्यामुळे येथील झोपडींची संख्या वाढत आहे.याच परिसरामध्ये महावितरणच्या सोनखार उपकेंद्राच्या समोरील भूखंडावरही ५० ते ६० झोपडी उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लावलेले तारेचे कुंपणही तोडण्यात आले आहे. झोपडीधारकांनी रोडवर व पदपथावरही कचरा टाकण्यास सुरुवात केली असून, सार्वजनिक स्वच्छतेला बाधा निर्माण होऊ लागली आहे. मलनि:सारण केंद्राच्या मागील बाजूलाही अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. सानपाडा सेक्टर १६ मधील भूखंडावरही ६० ते ७० झोपडी उभारण्यात आल्या आहेत. सेक्टर ८ मधील भूखंडावरहीजवळपास १०० झोपडी बांधण्यात आल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामधील अनेकांकडे वास्तव्याचे पुरावेही आहेत. यामुळे भविष्यात या जागेवरच कायम करण्याची मागणी अतिक्रमण करणाºयांकडून केली जाण्याची शक्यता आहे. झोपडीधारकांमुळे परिसरातील इमारतीमधील नागरिकही त्रस्त आहेत. व्यावसायिक इमारतीमधील वाहने रोडवर उभी केली जातात.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा या परिसरात वावर असल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय रात्री या परिसरातून ये-जा करण्याचीही भीती वाटू लागली आहे. सिडको व महापालिका प्रशासनाने या झोपडींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.स्वच्छ भारत अभियानाला हरताळपाम बीच रोड हा शहरातील महत्त्वाचा परिसर. याच परिसरामध्ये सानपाडामध्ये झोपडपट्टी वाढू लागल्या आहेत. या परिसरातील रोडवर व पदपथांवरही कचरा टाकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासले जात आहे, यामुळे महापालिका प्रशासनानेही येथील अतिक्रमण हटविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नाल्यामध्येही अतिक्रमणसानपाडा व जुईनगर यांच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक नाल्यामध्येही अतिक्रमण होऊ लागले आहे. जुईनगरच्या बाजूने नाल्यात डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असून, त्या अतिक्रमणांमध्ये विजेचाही वापर सुरू आहे. मीटर घेतला आहे की वीजचोरी सुरू आहे, हे तपासून कारवाई करण्याची मागणी होत आहे.कारशेड परिसरातही अतिक्रमणयाच परिसरामध्ये रेल्वेचे कारशेड आहे. कार शेडच्या जवळील भूखंडांवरही अतिक्रमण वाढू लागले आहे. सिडकोच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर झोपडी बांधल्या जात आहेत. वेळेत या अतिक्रमणांना आळा घातला नाही तर भविष्यात एमआयडीसीप्रमाणे या परिसरामध्ये झोपडपट्टी तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोक्याच्या भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण; पाम बीच रोडजवळील सानपाड्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:54 AM