नैना क्षेत्रातील अतिक्रमणांचा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:14 AM2017-12-08T01:14:19+5:302017-12-08T01:14:29+5:30
सिडकोच्या नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यात सिडको प्रशासनाला अपयश आले आहे.
नवी मुंबई : सिडकोच्या नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यात सिडको प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य विकासाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामांना आळा घालावा,
अशी मागणी विकासकांकडून होते आहे.
नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने तयार केलेल्या २३ गावांचा पथदर्शी प्रकल्पाच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच दुसºया टप्प्यातील विकास आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एकूणच पुढील वीस वर्षांत नैना क्षेत्राचा विकास करण्याचे सिडकोचे धोरण आहे. असे असले तरी या परिसरात उभारल्या जाणाºया अनधिकृत बांधकामांचा या विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नैना क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात सिडकोने आखून दिलेल्या नियमावलीला अनेक विकासकांचा विरोध आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी विकासक संघटनांकडून केली जात आहे. याचा परिणाम म्हणून विकास आराखड्याला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. याचा फायदा भूमाफियांनी घेतला आहे. बिनदिक्कतपणे बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. या बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोच्या संबंधित विभागासमोर मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात बेकायदा बांधकामांचा प्रश्न नैनाच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर आताच प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असून सिडकोने सर्वप्रथम या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा घालावा, अशी मागणी विकासकांकडून करण्यात येत आहे.