नवी मुंबई : वाशी तुर्भे रोडवर ट्रक टर्मिनलजवळील गॅरेजचालकांनी दुरुस्तीसाठी आलेली वाहने जोडरस्त्यासह मुख्य रोडवर उभी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून, मुंबई बाजार समिती परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे, परंतु यामधील अनेक रस्त्यांचा वाहतुकीऐवजी पार्किंगसाठीच वापर केला जाऊ लागला आहे.
यामध्ये वाशी तुर्भे रोडचाही समावेश आहे. पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूपासून ते देवीप्रसाद हॉटेलपर्यंत गटाराला लागून असलेला सर्व्हिस रोड व मुख्य रोडवरील एक लेनवर गॅरेज चालकांनी दुरुस्तीसाठी आलेली वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर बिनधास्तपणे रोडवरच दुरुस्तीची कामे सुरू असतात. यामधून गॅरेजचालक मोठ्या प्रमाणात पैसे कमावत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. सकाळी व सायंकाळी या ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.
वाहतूक पोलीस व महानगरपालिका प्रशासन गॅरेज चालकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत आहेत. गॅरेजचालकांमुळे रस्ता बकाल होत असून, स्वच्छ भारत अभियानावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळे रोडवरील अतिक्रमण थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी करण्यास सुरुवात केली आहे.