नवी मुंबई : ठाणे-बेलापूर महामार्गावरील तुर्भे नाका आणि ऐरोली रेल्वे स्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क, कॉल सेंटर आणि लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांना होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याची तक्रार काही कामगारांनी केली आहे.
सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे दुकानदार व्यावसायिकांप्रमाणे फेरीवाल्यांनीही बस्तान मांडले आहे. अनेक फेरीवाले दाटीवाटीने बसत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. ठाणे-बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वे स्थानकाशेजारी महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे. ऐरोली येथीलआयटी पार्क, कॉल सेंटर आणि कंपन्या असलेल्या ठिकाणी हजारो कामगार याच स्कायवॉकचा उपयोग करतात.
तुर्भे नाका येथे औद्योगिक क्षेत्रात काम करणारे हजारो कामगार, झोपडपट्टी परिसरातील नागरिक, तसेच व्यावसायिक सुरक्षिततेच्या दृष्टीने याच स्कायवॉकचा वापर करतात, परंतु या पुलावर अनेक फेरीवाले सकाळ, दुपार आणि सायंकाळी प्रवाशांच्या चालण्याच्या रस्त्यावर बस्तान मांडून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे पादचारी, कामगार वर्ग आणि नोकरी व्यवसायानिमित्त येथून येणाºया-जाणाºया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे विभाग कार्यालयात अनेक कर्मचारी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येते. या फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी येथे काम करणाºया कामगारांनी केली आहे. महापालिकेचे ऐरोली, घणसोली आणि तुर्भे विभाग अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हे होते आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. पादचाºयांना सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेला स्कायवॉक असून, फेरीवाल्यांना येथून कायमचे हटविण्याचे काम लवकरात लवकर केले जाईल.-अमरीश पटनीगिरे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका