नवी मुुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. पदपथावर अनधिकृतपणे मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. मार्जीनल स्पेसमध्ये दुकानदारांनी पोटभाडेकरू बसविले आहेत. स्टेशनच्या इमारतीमध्ये व प्रवेशद्वाराच्या बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे.
नवी मुंबईमध्ये सिडकोने भव्य रेल्वे स्टेशन उभारले आहेत, परंतु रेल्वे स्टेशनच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशनपैकी एक असणाऱ्या सानपाडा रेल्वे स्टेशनच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहिलेल्या असतात. स्टेशनमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गिकेमध्ये व्यावसायिकांनी मार्जीनल स्पेसमध्ये अतिक्रमण केले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठीच्या मार्गामध्ये पोटभाडेकरू बसविण्यात आले आहेत.
कपडे व इतर वस्तूंची विक्री सुरू केली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय होत आहे. याशिवाय प्रवेशद्वारामध्ये फेरीवालेही बसू लागले आहेत. तिकीट खिडकीच्या बाहेर पदपथावर ५० ते ६० मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. इमारतीमधील काही दुकानांच्या समोरही दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. भुयारी मार्गामध्ये खड्डे पडले असून, मोटारसायकलचा अपघात होऊ लागला आहे.
भुयारी मार्गाच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या समोरच पदपथावर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. रसाेई हॉटेलच्या बाहेर गटारावरील स्लॅब खचला आहे. अनेक महिन्यांपासून या स्लॅबची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. रात्री गटारात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीमध्ये सर्वत्र विजेच्या वायर लोंबकळत आहेत. विद्युत डीपी व इतर मोकळ्या जांगाची व्यवस्थीत साफसफाई केली जात नाही. प्रसाधानगृहांचीही व्यवस्थित स्वच्छता ठेवली जात नाही.