फेरीवाल्यांचे पदपथावर पुन्हा अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:54 AM2019-08-08T00:54:37+5:302019-08-08T00:54:47+5:30
विभाग कार्यालयाचे अभय? : दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा
नवी मुंबई : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर बस्तान ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यात पदपथांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागत आहे. वाशी व कोपरखैरणे विभागात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत, त्यानुसार फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी दिवसभर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर फेरीवाले दिसत नाहीत. मात्र, सायंकाळनंतर फेरीवाल्यांना पदपथ मोकळे करून दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ७ वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी विभागातील पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रात्री १०.३० वाजेपर्यंत पदपथांवर या फेरीवाल्यांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे पदचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
वाशी सेक्टर ९ परिसरात हा प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच नेरुळ आणि सानपाडा परिसरात फेरीवाल्यांकडून सायंकाळच्या वेळी होणारे
अतिक्रमण रहिवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक
विभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या आशीर्वादाने सायंकाळनंतर पदपथांवर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांचा ताप स्वच्छता कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. हे फेरीवाले परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी करतात. घनकचरा तेथेच टाकून निघून जातात. सडलेला भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक व इतर घनकचºयाचे ढीग साचत असल्याने सकाळी दैनंदिन साफसफाई करणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे.