नवी मुंबई : उद्यानाच्या सुरक्षा भिंतीवर रहिवाशांनी घराच्या भिंती बांधून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्यानालगतच्या एकापेक्षा अनेक रोहाउसधारकांनी अशा प्रकारे तिथली मलवाहिन्यांवरील मोकळी जागाही बळकावली आहे; परंतु उघडपणे ही बांधकामे होत असतानाही विभाग अधिकाºयांचे त्यावरील कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.घणसोली नोडच्या हस्तांतरानंतर पालिकेने विभागात अनेक नागरी कामांना गती दिली आहे; परंतु ही विकासकामे केली जात असताना, त्या ठिकाणी होणाºया अतिक्रमणांकडे मात्र डोळेझाक होत आहे. उघड्या मैदानांवर चायनिज सेंटर चालवले जात असून, अनधिकृत टपºयांचेही प्रमाण वाढले आहे. अशातच लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या उद्यानाची भिंतच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर-४ येथील २१४ क्रमांकाच्या भूखंडावर पालिकेने स्थानिकांच्या सोयीसाठी उद्यान बनवले आहे. या उद्यानाच्या कामाच्या पाहणीनिमित्ताने अनेकदा पालिकेच्या अधिकाºयांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत, त्यानंतरही उद्यानाच्या भिंतीवर झालेले अतिक्रमण त्यांच्या नजरेतून सुटले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.उद्यानाला लागूनच असलेल्या रहिवासी सोसायटीमधील सहा ते सात रोहाउसधारकांनी अशा प्रकारे जागा हडपलेली आहे. विशेष म्हणजे, हडपलेली जागा मलनि:सारण वाहिन्यांची असून, त्यावरच अतिक्रमण झालेले आहे.अंदाजे पाच ते सात फुटांची ही जागा हडपण्याकरिता उद्यानाच्या भिंतीवरच बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात उद्यानाच्या भिंतीसह सदर अनधिकृत बांधकामांनाही धोका उद्भवू शकतो. तर मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यास तिथली सफाई कशी करायची? असा प्रश्न पालिकेच्याच कर्मचाºयांना उद्भवणार आहे. शिवाय, भविष्यात उद्यानाचीही जागा हडपली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाºयांना तक्रारही केलेली आहे. त्यानंतरही उद्यानाच्या भिंतीवरील अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. यामुळे पालिका अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
उद्यानाच्या भिंतीवर अतिक्रमण; रहिवाशांनी मलवाहिन्यांची जागा हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 3:17 AM