सिडकोच्या भूखंडांवर भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:27 AM2020-02-23T01:27:29+5:302020-02-23T01:27:41+5:30
घणसोलीतील प्रकार; वर्षभरात ४ वेळा कारवाई; परिस्थिती जैसे थे!
- अनंत पाटील
नवी मुंबई : घणसोलीत सिडकोच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडांवर भंगारमाफियांनी अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी भूखंड नसल्याची ओरड सिडकोच्या संबंधित विभागाकडून केली जात आहे. मात्र त्याच वेळी सिडकोच्या मालकीच्या मोक्याच्या भूखंडांवर बिनदिक्कत अतिक्रमण केले जात असल्याचे दिसून आले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घणसोली सेक्टर २५ येथे तळवली-घणसोली मार्गावर दत्तनगर येथे मोक्याच्या ठिकाणी सिडकोचे अनेक मोकळे भूखंड आहेत. त्या भूखंडांवर सिडकोने आपल्या मालकीचे फलकही लावले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भंगार व्यावसायिकांनी त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे येथील अतिक्रमणांवर सिडकोच्या माध्यमातून अनेकदा कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा परिस्थिती जैसे थे असल्याने सिडकोच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण गेल्या वर्षभरात येथील भंगारमाफियांवर तीन ते चार वेळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरसुद्धा येथील भंगारचा व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी याच अतिक्रमण करण्यात आलेल्या भंगार व्यावसायिकांवर चार वेळा कारवाई करण्यात आली होती. नवी मुंबई आणि रायगड परिसरातील ९५ गावांतील शेतजमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. मात्र कवडीमोल दराने आपल्या जमिनी देणारे प्रकल्पग्रस्त मात्र अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे भूखंड उपलब्ध नसल्याचे कारण देत सिडकोने साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप बंद केले आहे. त्याच वेळी सिडकोचे कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडांवर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची योजना पूर्ण करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.
अनधिकृत बांधकामांचे पेव
घणसोली विभागात तळवली, गोठीवली, घणसोली, नोसिल नाका झोपडपट्टी आणि रबाळे गाव येथे महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अतिक्रमणाचे पेव फुटले आहे. या परिसरात दिवसाआड नवीन बांधकामे उभारली जात आहेत. विशेष म्हणजे या बांधकामांसाठी लागणारे साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे वाहतुकीलासुद्धा अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बांधकामांसाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे घणसोली येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावपाळी ते दत्तनगर दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.