पाण्याच्या पाइपलाइनवर अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:22 AM2019-12-19T00:22:38+5:302019-12-19T00:23:02+5:30
सुकापूर येथील प्रकार : अतिक्रमण हटवण्याचे ग्रामपंचायतीचे नवी मुंबई महापालिकेला पत्र
पनवेल : नवी मुंबई महापालिकेच्या पाण्याच्या पाइपलाइनवर सुकापूर येथे अतिक्रमण करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. येथील अतिक्रमण निष्कासित करून पाइपलाइन मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायतीने नवी मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे.
पाली-देवद ग्रामपंचायत हद्दीतून नवी मुंबई महापालिकेची पाइपलाइन गेलेली आहे. या पाइपलाइनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बांधकाम केले गेले आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात टपऱ्या व दुकाने थाटण्यात आलेली आहेत. या लाइनवर अनधिकृत व्यवसाय केला जात आहे. नवी मुंबई पालिकेने अघटित घटना घडण्यापूर्वी येथील अनधिकृत दुकाने काढून टाकावीत, अशी मागणी केली जात आहे. अतिक्रमण केल्यामुळे येथील पाइपलाइन झाकण्यात आली आहे. अशा प्रकारे लोकांच्या नजरेत न येणाºया पाइपलाइनमध्ये छेडछाड करून कोणी विक्षिप्तपणे पिण्याच्या पाइपलाइनमध्ये काही विषप्रयोग केल्यास त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ पोटकलम १ अन्वये गावाच्या गावठाण क्षेत्राच्या सीमेतील अतिक्रमण काढण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस आहेत. मात्र, ही जागा गावठाण क्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर नवी मुंबई पालिकेने कारवाई करण्याची मागणी केली आहे.